सांगली- जिल्ह्यातील वारणा नदी काठावरील अखेरचे गुऱ्हाळघरही बंद झाले आहे. शिराळा तालुक्यातील कंदूर येथील शेवटचे गुऱ्हाळघर यंदा फक्त आठवडाभर चालले. त्यानंतर या गुऱ्हाळघराचीही धडधड बंद झाली.त्यामुळे वारणा खोर्यातून गुऱ्हाळघरे आता नामशेष झाली.
वारणा नदीच्या किनाऱ्यावर म्हणजे शिराळा आणि वाळवा तालुक्यात नदीच्या किनारी भागांत मोठ्या प्रमाणावर ऊस शेती होती.साखर उद्योगाची भरभराट होण्यापूर्वी वारणा खोऱ्यात मोठ्या संख्येने गुऱ्हाळे होती.दहा वर्षांपूर्वी किमान दीडशे गुऱ्हाळघरांच्या चिमण्यातून धूर निघत होता. मात्र, गेल्यावर्षी शिराळा तालुक्यातील कंदूर येथील सुभाष पाटील यांचे एकमेव गुऱ्हाळ सुरू होते. त्यांनी सांगितले की, यंदा गुऱ्हाळ साधारण आठवडाभर चालवले.यावेळी गुळाला ३७ ते ३८ रुपये किलो दर मिळाला. इतका कमी दर मिळाला तर गुऱ्हाळघर चालू शकत नाहीत. उत्पादन खर्चही निघत नाही.किमान ४२ रुपये किलो दर मिळाला तर कामगार,वाहतूक आणि गुऱ्हाळाचा खर्च निघतो.