सांगली – वाळवा तालुक्यातील बंधार्यानजीक वारणा नदीत मोठ्या प्रमाणात मळीसद़ृश रसायन मिसळले गेल्याने नदीपात्रात दुर्मिळ मासे मृत्युमुखी पडत आहेत.आधीच बागणी परिसरात दूषित पाण्याने कावीळसद़ृश आजाराचे रुग्ण सापडत असल्याने नदीत मळीसद़ृश घातक रसायन सोडण्यात आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वारणा नदीत आरोग्याला धोकादायक रसायनांचा अंश असलेले पाणी मिसळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जलप्रदूषणावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र याकडे सोयीस्करपणाने डोळेझाक करत आहे. नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या जीवघेण्या घातक रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील दुर्मीळ मासेदेखील तडफडून मृत्युमुखी पडू लागले आहेत.या नदीत खास करुन वाम, रोहू, कटला तसेच अन्य विविध स्थानिक प्रजातीचे मासे आढळतात.आधीच या प्रजाती दुर्मीळ होत आहेत. यातच आता जलप्रदूषणामुळे हे मासे झपाट्याने मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे या माशांचे नदीतील अस्तित्व नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.