पिंपरी – शहरातील कुदळवाडी, तळवडे आणि भोसरी-शांतीनगर परिसरात कार्यरत असलेल्या लघुउद्योजकांना वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्याचा झटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या ऑर्डर पूर्ण करण्यास विलंब होणे, मशीनमधील काही सुटे भाग खराब होणे, कामगारांना कामाशिवाय बसवून ठेवावे लागणे आदी माध्यमातून आर्थिक व अन्य नुकसान होत असल्याने लघुउद्योजक त्रस्त झाले आहेत.
कुदळवाडी, तळवडे आणि भोसरी औद्योगिक वसाहतीमध्ये लघुउद्योगांचा जलद विस्तार झाला आहे. या परिसरात छोट्या-मोठ्या शेडमध्ये विविध उद्योग सुरु आहेत. तळवडे परिसरात गट नंबर 63 आणि 70 येथे एकच ट्रॉन्सफॉर्मर आहे. तेथे ट्रॉन्सफॉर्मर (विद्युत रोहित्र) बसविण्यासाठी जागा न मिळाल्याने दुसरा ट्रॉन्सफॉर्मर बसविलेला नाही. त्यामुळे एका ट्रॉन्सफॉर्मरवर अधिकचा ताण येऊन व्होल्टेजमध्ये अडचणी, वीजपुरवठा खंडित होणे असे प्रकार वारंवार घडतात. उन्हाळा आणि पावसाळा या दोन ऋतुंमध्ये प्रामुख्याने या समस्येचे प्रमाण वाढते, असे लघुउद्योजकांचे म्हणणे आहे.