मुंबई – एनसीबीचे माजी अधकारी समीर वानखेडे यांची सीबीआयने आज तब्बल पाच तास चौकशी केली. तब्बल पाच तासांच्या चौकशीनंतर त्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. सीबीआयकडून चौकशी सुरू असतानाच सीबीआयसीनेही वानखेडेंची चौकशी सुरू केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी दिल्लीतूनदेखील सीबीआयची टीम मुंबईत आली आहे. वानखेडे सकाळी साडेदहा वाजता सीबीआयच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील कार्यालयात आले. त्यानंतर लंच ब्रेकच्या आधी आणि नंतर अशी जवळपास पाच तास त्यांची चौकशी झाली. या चौकशीत वानखेडेंची संपत्ती, महागड्या गाड्या, घड्याळे आणि परदेश वाऱ्यांवरील खर्च याबाबत सीबीआयने त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सीबीआय कदाचित पुन्हा एकदा समीर वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावू शकते.
सीबीआयसी म्हणजे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाच्या अधिपत्याखाली अंतर्गत महसूल सेवा वानखेडे अधिकारी म्हणून काम करतात. या विभागाकडूनही आता समीर वानखेडेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे. एनसीबीच्या एसआयटीने तयार केलेला अहवाल सीबीआयसी विभागाकडेही देण्यात आला आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता याच अहवालाच्या आधारे त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.