भोपाळ : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये रविवारी आलेल्या वादळामुळे महाकाल लोकमधील सप्तर्षींपैकी सहा मूर्तीं कोसळल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबर २०२२ रोजी उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिरात महाकाललोकचे उद्घाटन केले होते.
उज्जैनमध्येच सांदीपनी आश्रमासमोर वादळामुळे एक झाड उन्मळून पडले. या अपघातात अनेक भाविक थोडक्यात बचावले आहे. महाकाल लोकमधील सप्तर्षींच्या एका ऋषीच्या मूर्तीचे मस्तक वाऱ्यामुळे वेगळे होऊन कोसळल्याचा एक व्हडियो देखील व्हायरल झाला आहे. पहिल्या टप्प्यातील महाकाल लोकचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. यासाठी सुमारे ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यात मान्सूनपूर्व वादळाच्या या तडाख्यात आलेल्या वादळाचा फटका येथील महाकालला बसला असून, सात मूर्तींपैकी सहा मूर्ती कोसळल्या आहे. मध्य प्रदेशात आजपासून भोपाळ, ग्वाल्हेरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी भोपाळमध्ये ढगाळ वातावरण होते. सागर, छतरपूर, दमोह, पन्ना, टिकमगड आणि निवारी येथे गारपीट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ७० किमीपर्यंत असेल असाही अंदाज आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडी ने ईशान्य भारतातही पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आसाम आणि मेघालय आणि मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील २४ तासांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.