जळगाव
जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. येथील तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अशातच अमळनेर येथील एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. रुपाली राजपूत असे या महिलेचे नाव आहे. रुपाली या जळगाव जिल्ह्यातील यंदाच्या मोसमातील उष्माघाताच्या पहिल्या बळी ठरल्या.
रुपाली एका विवाह समारंभासाठी अमरावतीला गेल्या होत्या. रेल्वे प्रवास करुन त्या भर उन्हात आपल्या घरी गेल्या होत्या. मात्र, काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि उलट्या होऊ लागल्या. त्रास वाढताच त्यांनी फॅमिली डॉक्टरकडून प्राथमिक उपचार करुन घेतले होते. त्यानंतर काही वेळासाठी त्यांना बरेही वाटले. मात्र, काही वेळाने त्यांना पुन्हा एकदा उलट्यांचा त्रास होऊ लागला व त्या बेशूद्ध पडल्या. यावेळी कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन केले असता उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.