भंडारा – आमगाव दिघोरी परिसरातील कवळे वाडा येथे काल वाघाच्या हल्ल्यात नंदा खंडाते (४५) ही महिला ठार झाल्यानंतर वाघाला जेरबंद क. अशी मागणी करत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या वाहनांची तोडफोड केली.
नंदा खंडाते या वाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिपाई म्हणून काम करत होत्या. संध्याकाळी कामावरून परत आल्यानंतर शेतात तुरी तोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळेस वाघाने नंदावर हल्ला करून त्यांना ठार केले. वाघाने त्यांचा मृतदेह लगतच्या झुडपात फरफटत नेला. त्यानंतर मृतदेहाजवळ बसून राहिला. ग्रामस्थांनी याची माहिती वनाधिकारी आणि पोलीस विभागाला दिली. त्यानंतर भंडारा प्रादेशिक वन विभाग आणि कोका एसटीपीएफच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. कवळे वाडा हे गाव जंगलव्याप्त असून नागझिरा अभयारण्य क्षेत्रात आहे. या परिसरात नेहमीच जंगली प्राण्यांच्या वावर असतो. या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.
रात्री उशिरा मृत महिलेच्या मृतदेहाजवळ ठाण मांडून बसलेल्या वाघाला डॉट मारून वन विभागाने बेशुद्ध करून जेरबंद केले. मात्र ग्रामस्थांनी नंदा खंडातेचा मृतदेह जेरबंद केलेल्या वाघाच्या पिंजऱ्यासमोर ठेवत खंडाते कुटुंबियांना तातडीने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी. तसेच कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी केली. संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या वाहनांची तोडफोड केली. जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि खासदार प्रशांत पडोळे यांनी नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर नंदा खंडातेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला.