वाईन शॉप आणि बारमध्ये सीसीटीव्ही पाळत ठेवण्याची योजना स्थगित केली

मुंबई – अल्पवयीन मुलांमध्ये मद्यपानाच्या वाढत्या व्यसनाला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेली वाईन शॉप आणि बारमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय पॉवर्ड)आधारित सीसीटिव्ही बसवण्याची योजना राज्य सरकारने स्थगित केली आहे.पुणे येथील पोर्श कार अपघात आणि मुंबईच्या वरळीत घडलेल्या हिट अँड रनच्या दोन घटनांमुळे अल्पवयीन मुलांच्या मद्यपानाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या समस्येवर तोडगा म्हणून तत्कालीन उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभुराज देसाई यांच्या कार्यकाळात वाईन शॉप आणि बारमध्ये एआय पॉवर्ड सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना उत्पादन शुल्क विभागाने तयार केली होती. या एआय पॉवर्ड कॅमेरॅंमध्ये चेहरा पाहून संबंधित व्यक्तिचे वय निश्चित करण्याची क्षमता आहे. त्यामुळे वाईन शॉपवर मद्य विकत घेणारी किंवा बारमध्ये बसून मद्यपान करणारी व्यक्ती अल्पवयीन आहे किंवा नाही याची माहिती तत्काळ मिळवता येते.ही योजना पहिल्या टप्प्यात मुंबईत प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार होती. मुंबईत यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यात योजनेचा विस्तार करण्याचा सरकारचा मानस होता. मात्र सुरुवातीच्याच टप्प्यावर योजनेसमोर अनंत अडचणी आल्या. वाईन शॉप आणि बारमालकांचा विरोध आणि अन्य अडचणी पाहता योजना राबविणे व्यवहार्य नसल्याचे आढळल्याने सरकारने ही योजना स्थगित केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top