मुंबई – वांद्रे-वर्सोवा सागरी सातूचा (सी लिंक) अंदाजित खर्चात तब्बल ६ हजार ७८८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आता या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १८ हजार १२० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.सुरुवातीपासून अनेक अडथळ्यांचा सामना करीत असलेल्या या प्रकल्पाचे आतापर्यंत अवघे १७ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पामध्ये वारंवार करण्यात आलेल्या सुधारणा आणि काम पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी दिलेली मुदतवाढ यामुळे प्रकल्पाच्या खर्चात तब्बल १४० टक्क्यांची वाढ झाली आहे.२०१७ मध्ये जेव्हा या प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा त्याचा अंदाजित खर्च ७ हजार ७०२ कोटी रुपये होता.मात्र आता तो खर्च जवळपास तिप्पट झाला आहे. या प्रकल्पाला कोरोना महामारीचाही फटका बसला. प्रकल्पाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात २०१९ मध्ये झाली. सन २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. पण प्रकल्पाच्या आराखड्यात अनेकदा बदल किंवा सुधारणा करण्यात आले. त्यामुळे प्रकल्पाचे काम बऱ्याचदा रखडले.१७.७ किलोमीटरचा हा सागरी सेतू महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविला जात आहे. हा सागरी सेतू आठ पदरी आहे. मात्र अनेक कारणांनी रखडलेला हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होईल याबाबत साशंकता आहे.