वसई – वसई पूर्व येथील नवजीवन परिसरात खदानीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नवजीवन परिसरात अनेक खदानी आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या खदानींमध्ये पाणी भरते. आसपासच्या परिसरातील मुले येथे पोहण्यासाठी येतात. गुरुवारी दुपारी बांगडीपाडा येथील चार पाच मुले या ठिकाणी आली होती. त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज नव्हता. त्यामुळे सोपान सुनील चव्हाण (१४) आणि नसीम रियाज अहमद चौधरी (१५) ही दोन मुले पाण्यात बुडाली.
आसपासच्या लोकांना याची माहिती मिळताच रहिवाशांनी दोघांनाही पाण्याबाहेर काढले. त्यांना तत्काळ रेज नाका येथील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.