वसई – वसईच्या अग्रवाल सिटी येथील मंयक ज्वेलर्सवर काल रात्री २ हल्लेखोरांनी बंदूकीच्या धाकावर सशस्त्र दरोडा टाकला आणि त्यांनी सराफ दुकानाचे मालक रतनलाल संघवी यांना बेदम मारहाण करत दुकानातील ६५ ते ७० रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला. माणिकपूर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके स्थापन केली आहेत.
वसई पश्चिमेच्या बाभोळा येथील अग्रवाल दोशी कॉम्प्लेक्समध्ये मयंक ज्वेलर्स हे दुकान आहे.या दुकानाचे मालक रतनलाल संघवी (६७)असून त्यांचा मुलगा मनिष संघवी त्यांना मदत करतो. मनिष कामानिमित्ताने बाहेर गेला होता. रात्री सव्वानऊ वाजता रतनलाल संघवी दुकान बंद करण्याच्या तयारीत होते. ते दागिने असलेले ट्रे कपाटात ठेवत होते.त्यावेळी दोन सशस्त्र हल्लेखोर दुकानात शिरले. त्यांनी संघवी यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांनी बंदुकीच्या धाकावर संघवी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यानंतर संघवींना आतल्या खोलीत डांबून दागिने घेऊन ते पसार झाले. हल्लेखोरांपैकी एकाने डोक्यात हेल्मेट घातले होते तर दुसर्याने मुखपट्टी (मास्क) लावून चेहरा झाकला होता.