जालौन – उत्तर प्रदेशातील जालौनमध्ये लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बस आणि अज्ञात वाहनाची धडक झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर, १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले.
शनिवारी रात्री जालौनच्या मधौगढ कोतवाली भागात हा अपघात झाला. बस रेंधरच्या मढेरा गावातून रामपुराकडे निघाली होती. विवाह सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर सर्वजण बसने परतत होते. बस गोपाळपुराजवळ आल्यानंतर हा भीषण अपघात झाला. अपघातावेळी १० जण बसमध्ये होते. या अपघातात बसचे पूर्ण नुकसान झाले. वाहनांच्या काचा रस्त्यावर विखुरलेल्या दिसल्या. दरम्यान, बस ज्या अज्ञात वाहनाला धडकली त्याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच अपघाताची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली. या अपघातात काही जणांना किरकोळ दुखापतही झाली असून, त्यांना मलमपट्टी करून घरी पाठवण्यात आले.