नवी दिल्ली – टी-20 विश्वचषकावर दुसर्यांदा नाव कोरणारा भारतीय संघ आज सकाळी वेस्ट इंडिजमधून सोळा तासांचा प्रवास करून खास विमानाने दिल्लीला पोहोचला. विमानतळावरच त्यांचे जोरदार स्वागत झाल्यानंतर खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले. पंतप्रधानांनी त्यांच्यासाठी खास चहापान सोहळा आयोजित केला होता. पंतप्रधानांचा दीड तास पाहुणचार घेतल्यानंतर भारतीय संघ मुंबईला रवाना झाला. मुंबईत तर त्यांचे अभूतपूर्व स्वागत झाले. मरिनड्राईव्हपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन डेकमधून सर्व खेळाडूंची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केली होती. क्रिकेटप्रेमी मिरवणुकीतील खेळाडूंचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करताना दिसत होते. तब्बल दीड तास ही मिरवणूक सुरू होती. त्यानंतर वानखेडेत सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
संध्याकाळी मुंबईत भारतीय संघाची विशेष रंगवलेल्या आणि सजवलेल्या उघड्या बसमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघाचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी क्रिकेटप्रेमींची अफाट गर्दी उसळली होती. विजयीवीरांचा असा स्वागत सोहळा यापूर्वी कधी पाहिला नाही, अशी भावना अनेक क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली.
आज सकाळी सहा वाजून 5 मिनिटांनी विश्वविजयी भारतीय संघाला घेऊन येणारे एअर इंडियाचे बोईंग 771 विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. भारतीय संघाच्या स्वागतासाठी इतक्या सकाळीही विमानतळावर मोठी गर्दी जमली होती. चाहते पहाटेपासूनच भारतीय संघाची वाट पाहत होते. विशेष म्हणजे त्यावेळी दिल्लीत रिमझिम पाऊस पडत होता. मात्र चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. चॅम्पियन संघ आणि ट्रॉफीची झलक पाहण्यासाठी चाहते आतूर होते. त्यांच्या हातात तिरंगे होते. ते ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत होते. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारतीय संघाचे विमानतळावर स्वागत केले. कर्णधार रोहित शर्माने हातात विश्वचषक घेऊन चाहत्यांना अभिवादन केले. विमानतळावर चाहत्यांनी प्रेमाने अनेक केक आणले होते. ते कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि हार्दिक पंड्या यांनी कापले. खेळाडू विमानतळाबाहेर पडताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. बाहेर वादन करणार्या पथकांनी त्यांचे स्वागत केले. रोहित शर्माने भांगड्याचा ताल धरला. त्यानंतर खेळाडू बसमधून मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये पोहोचले. तिथेही त्यांचे ढोल-ताशे आणि भांगडा पथकाने जोरदार स्वागत केले. सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, ऋषभ पंत यांनी तिथेही ठेका धरला. खेळाडू तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांशी हस्तांदोलन करत होते. सुरक्षारक्षकही चाहत्यांना अडवत नव्हते. तिथे पुन्हा एकदा केक कापण्याचाही कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे सोळा तासांच्या प्रवासानंतरही खेळाडू थकलेले दिसत नव्हते. त्यांच्यात वेगळीच ऊर्जा दिसत होती.
मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये काही तास विश्रांती घेतल्यावर खेळाडू लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले. त्यावेळी त्यांनी भारतीय संघाची जर्सी घातली होती. तिथे तब्बल दीड तास त्यांनी व्यतित केला. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीम इंडियाची जर्सी भेट देण्यात आली. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शहा यांच्याकडून छअचज 1 असे लिहिलेली जर्सी पंतप्रधान मोदी यांना भेट देण्यात आली. टीम इंडियाच्या खेळाडूंना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. नंतर नरेंद्र मोदींनी एक्स हँडलद्वारे या भेटीचे दोन फोटो शेअर करत लिहिले की, चॅम्पियन्ससोबत छान भेट झाली.
संध्याकाळी टीम इंडिया दिल्लीहून मुंबईत पोहोचले. पाण्याचे फवारे मारून विमानतळावर त्यांच्या विमानाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर भारतीय खेळाडू एकेक करत विमानतळावरून बाहेर पडले. विमानतळावर देशभक्तिपर गीत लावून त्यांचे स्वागत करण्यात आले. वि मानतळावरून खेळाडू नरिमन पॉईंटवर आल्यावर खास तयार करण्यात आलेल्या उघड्या बसमधून त्यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली.
नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमच्या रस्त्यावर चाहत्यांची दुतर्फा प्रचंड गर्दी होती. या गर्दीतून मिरवणुकीला सुरुवात झाली. बसच्या पुढे मुंबई पोलिसांचे मोठे पथक सुरक्षेसाठी होते. तर बसच्या मागेही पोलिसांचा ताफा होता. मरिनड्राईव्ह ते वानखेडे दरम्यान तब्बल दीड तास ही मिरवणूक सुरू होती. यावेळी दुतर्फा उभे असलेले चाहते टीम इंडियाच्या जयजयकाराच्या घोषणा देत होते. मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटींग करीत होते. विजयी मिरवणुकीची वानखेडेवर सांगता झाली. त्यानंतर बीसीआयकडून खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच संघाला 125 कोटींचा चेक देण्यात आला.
मुंबईकर टी-20 विश्वविजेत्यांचा
आज विधान भवनात सत्कार
विश्वविजेत्या क्रिकेट टीममधील मुंबईतील खेळाडू रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल यांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षीस देऊन विधिमंडळाच्या सभागृहात खास सत्कार करण्यात येणार आहे. तशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी आज केली होती. या कार्यक्रमासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या आमदारांना निमंत्रित करावे, अशी मागणीही सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यानंतर हा सोहळा उद्या होणार असल्याचे ठरले. दरम्यान हे खेळाडू उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
स्वागतासाठी गुजरातची बस का?
टीम इंडियाच्या बसवरून टीका
विश्वविजेत्या टीम इंडियाचे मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आले. पण या स्वागतासाठी वापरण्यात आलेली बस वादात सापडली आहे. ही बस गुजरात येथून आणण्यात आल्याचे सांगत नाना पटोले, आदित्य ठाकरे, रोहित पवार आदी नेत्यांनी टीका केली. विशेष म्हणजे, या बसवर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांचेही छायाचित्र होते. ते कशासाठी, असाही सवाल उपस्थित झाला. विश्वविजेत्या टीम इंडियाची मुंबईत मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी विजयी यात्रा काढण्यात आली. यासाठी खास गुजरात येथून ओपन डेक बस आणण्यात आली. वर्ल्डकप टीमच्या रॅलीसाठी आलेल्या गुजरातच्या बसला आम्ही चांगली पार्किंगची जागा देऊ. पण, बेस्ट बसचा वापर केला पाहिजे. बीसीसीआयने मोठी आणि चांगली बस आणली असेल, पण आमच्या भावना बेस्टसोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे, टीम इंडियाच्या रॅलीत बेस्टची बस वापरल्यास आम्हाला अधिक आनंद होईल, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील महायुतीचे सरकार हे गुजरातधार्जिणे आहे. मोदी आणि शहा यांना ते त्यांचा ’आका’ म्हणतात. मुंबईच्या बेस्टकडे चांगल्या दर्जाची ओपन डेक बस असताना वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंच्या मिरवणुकीसाठी गुजरातमधून बस आणणे हा खेळाडूंचा अपमान आहे. दिल्लीच्या आदेशावरून गुजरातची बस मुंबईत आणली असावी. खेळाडूंचे कौतुक केले पाहिजे, पण त्यासाठी गुजरात समोर झुकण्याची गरज नव्हती, असे नाना पटोले म्हणाले. माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे यांनीही गुजरातहून बस आणण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
हा चषक संपूर्ण देशवासियांसाठी
रोहित शर्माकडून कृतज्ञता व्यक्त
वानखेडेवरील सत्कार समारंभात बोलताना रोहित शर्माने सांगितले की, हा चषक संपूर्ण देशवासियांसाठी आहे. मला माझ्या संघाचा अभिमान आहे. सूर्यकुमार यादव याचा झेल अप्रतिम होता. आज चाहत्यांकडून जे प्रेम आणि सन्मान मिळाला त्याबद्दल मी आणि माझा संघ आभारी आहोत. मुंबई कधी कुणाला निराश करीत नाही. हे आजही अनुभवायला मिळाले, असेही रोहित शर्मा म्हणाला. तर युवा पिढीने भविष्यात देशाचे नाव रोशन करावे. मी आणि रोहित 15 वर्षांपासून एकत्र आहोत आणि देशासाठी वर्ल्डकप जिंकायचा असे आम्ही ठरवलेच होते, असे विराट कोहलीने सांगितले.