मुंबई – मुंबईतील वरळी बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहा याच्या अटकेला आव्हान देणारी त्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने त्याची सुटका करण्यासही नकार दिला.
मुंबईतील वरळी परिसरात ९ जुलै रोजी भरधाव वेगात आलेल्या बीएमडब्ल्यू कारने कावेरी नाखवा नावाच्या महिलेला चिरडले. या मोटारीत मिहीर शहा आणि त्याचा ड्रायव्हर राजऋषी बिंदावत होता. कारने त्यांना सुमारे दोन किलोमीटरपर्यंत फरपटत नेले होते. या अपघातात त्यांचे पती प्रदीप नाखवा हेदेखील जखमी झाले आहेत. मिहीर घटनास्थळावरून पळून गेला होता. त्याला दोन दिवसांनी त्याला अटक झाली. मिहीर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे.राजेश शहा यांना जामीन मंजूर झाला आहे, तर मिहीर आणि बिंदावत न्यायालयीन कोठडीत आहेत.
याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ५० नुसार आवश्यक असलेल्या त्यांच्या अटकेसाठी पोलिस योग्य कारणे देण्यात अयशस्वी ठरले. त्यांच्या बेकायदेशीर अटकेमुळे वैयक्तिक स्वातंत्र्याच्या त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले. त्यामुळे त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी. मात्र, आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे, हे लक्षात घेता त्यांना अटक करण्याच्या कारणाची माहिती देण्याची गरज होती का, असा सवाल खंडपीठाने केला. सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी आरोपींना त्यांच्यावरील आरोपांची पूर्ण माहिती असल्याचा युक्तिवाद करत याचिकेला विरोध केला.