मुंबई- वरळीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव आणि ‘बेस्ट’ बसेसच्या समस्यांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्यांचा आढावा घेऊन तातडीने या समस्या सोडवा, अशा सूचना नुकत्याच शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांना दिल्या.
‘बेस्ट’ प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे वरळीकरांना गेल्या अनेक दिवसांपासून मनस्ताप सहन करावा लागत आहे.एकदा गेलेली वीज परत येण्यासाठी तब्बल १० ते १२ तासांचा वेळ लागत आहे. याचा कामावर विपरित परिणाम होत आहे. शिवाय ‘बेस्ट’ बसेसच्या कमतरतेमुळे प्रवाशांना तासंतास रखडून राहावे लागत आहे. यामुळे कामावर जाणारय नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वरळीकरांकडून आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत आदित्य ठाकरे यांनी आज ‘बेस्ट’ महाव्यवस्थापक डिग्गीकर यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. यावर महाव्यवस्थापकांनी सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार सुनील शिंदे, माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर उपस्थित होते.