जुन्नर- तालुक्यातील वडगाव आनंद परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.
वडगाव आनंद गावातील शाळेजवळ असलेल्या मळ्यात बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले होते. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी याठिकाणी वनविभागाने पिंजरा लावावा,अशी मागणी केली होती.त्यानुसार वनविभागाने शाळेच्या बाजूला असलेल्या शेतात पिंजरा लावला होता. आज पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला. घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वनाधिकारी अनिल सोनवणे व कैलास भालेराव यांनी पकडलेल्या बिबट्याला निवारण केंद्रात सोडले आहे. हा बिबट्या मादी असून तिचे वय सहा ते सात वर्षे आहे. दरम्यान, या गावात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर असून याठिकाणी उसाचेही क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे वनविभागाने या ठिकाणी असलेल्या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी या परीसरातील नागरीकांनी केली आहे.