नवी दिल्ली – संसदेत सादर झालेल्या वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात २४ नोव्हेंबरला पाटणा आणि आंध्र प्रदेशात भव्य रॅली होणार आहे, अशी घोषणा जमियत उलेमा ए हिन्द या मुस्लीम संघटनेने आज केली. या संघटनेने दिल्ली आज संविधान संरक्षण संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनात देशातील अनेक मुस्लीम संघटना सहभागी झाल्या होत्या.
जमियत उलेमा ए हिन्दचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष मौलाना अशहद रशिदी या संमेलनात बोलताना म्हणाले की, २४ नोव्हेंबरला पाटण्यात होणार्या सभेला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारही उपस्थित राहणार आहेत. आम्ही पुढील महिन्यात आंध्र प्रदेशात मोठी रॅली आयोजित करण्यात येणार असून पाच लाख लोक या रॅलीला उपस्थित राहातील. आम्ही आमचा मुद्दा चंद्राबाबू नायडू यांच्या कानावरही घालणार आहोत. कारण ते सरकारमध्ये सहभागी आहेत. आमची इच्छा आहे की चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार आणि चिराग पासवान यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करावा. वक्फ कायद्यात बदल सुचवणारे वक्फ सुधारणा विधेयक मोदी सरकारने संसदेत सादर केले आहे. विरोधी पक्षांच्या विरोधानंतर ते संसदीय समितीकडे गेले आहे.