वक्फ कायद्याबाबत केंद्राशी बोलणार अजित पवारांनी मुस्लिमांना जवळ केले

मालेगाव -अजित पवारांच्या खांद्यावर पक्षाची पूर्ण जबाबदारी आली आणि त्यांचे वागणे बदलले. त्यांचा रोखठोकपणा गायब होऊन राजकारणी चेहरा सजग झाला आहे. मुस्लिमांना याचा प्रत्यय आला. मुस्लिमांच्या वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मोदी सरकारने गेल्या आठवड्यात संसदेत माडले. मुस्लिमांनी आणि विरोधकांनी त्याला कडाडून विरोध केल्याने चर्चेनंतर हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु भाजपा हे विधेयक मंजूर करण्यासाठी आग्रही असताना राज्यातील महायुती सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळाच सूर लावला आहे. आज मुस्लीमबहुल मालेगावात गेल्यावर ते म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या कायद्याच्या बाबतीत काही चुकीचे होत असेल तर मी स्वतः केंद्र सरकारसोबत बोलेन. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एनडीएमधील चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशीही बोलेन. त्यांच्या या ‘लांगूलचालन’ वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जनसन्मान यात्रा’ सुरू आहे. ही यात्रा आज मालेगाव येथे आली असता माजी आमदार आसिफ शेख आणि मुस्लीम समाजातील शिष्टमंडळाने अजित पवार यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान मुस्लीम समाजाने केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड कायद्यातील प्रस्तावित बदलांबाबत अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यावर अजित पवार लगेच म्हणाले की, या कायद्यात काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, तर मी स्वतः केंद्र सरकारशी या विषयाबाबत बोलेन, असा विश्‍वास मी तुम्हाला देतो. मुस्लिमांना या कायद्याबाबत चिंता वाटत असेल, तर मी तुमचे म्हणणे ऐकेन. अल्पसंख्याकांवर अन्याय होऊ देणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एनडीएमधील चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार, चिराग पासवान माझ्यासोबत आहेत. त्यांना सोबत घेऊन मी केंद्र सरकारसोबत चर्चा करून मार्ग काढेन. घटक पक्षांच्या सर्व खासदारांशी चर्चा केल्यानंतरच हा कायदा आणला जाणार आहे. त्यामुळे अफवांवर कुणी विश्‍वास ठेवू नये.
मुस्लिमांचे मन जपत ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्ष विचारधारा घेऊन पुढे जात आहे. आम्ही अठरा पगड जातीला घेऊन जाणार आहोत. कोणत्याच जातीवर अन्याय करणार नाही. काल मी कोल्हापूरमध्ये होतो. विशाळगडजवळील गजापूर गावातील निष्पाप लोकांवर अन्याय करण्यात आला. मी स्वतः तिथे गेलो होतो. तिथल्या कुणाचा दोष नव्हता. सरकारकडून तिथल्या प्रत्येक कुटुंबाला 50 हजार रुपये दिले आहेत. त्यानंतर दुसरा हप्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 50 हजार रुपयांचा देण्यात आला. त्या नागरिकांना नुकसान भरपाईपोटी दीड कोटी रुपये सरकारने दिले आहेत, असेही पवार म्हणाले.
अजित पवार यांनी मुस्लीम मतदारांना खूश करण्यासाठी असे वक्तव्य केले असले तरी मित्रपक्ष असलेल्या भाजपाला ते रुचण्याची शक्यता नाही. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी वक्फ विधेयकाबाबत अद्यापि कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तर नितीशकुमार यांचा जदयू आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने विधेयकाला पाठिंबा दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top