मुंबई : लोकल सेवेचा सतत होणारा खोळंबा, लोकलची गर्दी यावर कोणताही तोडगा रेल्वे प्रशासनांकडून काढण्यात येत नाही त्यामुळे हैराण झालेल्या रेल्वे प्रवासी आणि संघटनांनी अनोखे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष्य वेधण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार बुधवार २२ ऑगस्ट रोजी मध्य , हार्बर व पश्चिम लोकल प्रवासी शुभ्र वस्त्र परिधान करून प्रवास करीत शांततापूर्ण आंदोलन करणार आहेत. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ आणि सायंकाळी ५ ते १० दरम्यान लोकलमधून प्रवास करणे जीवघेणे झाले आहे. विविध कारणांनी विस्कळीत होणाऱ्या लोकलमुळे ऐन गर्दीच्या वेळी लोकलमधून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. मात्र, याकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा करते असा आरोप प्रवाशांकडून होत आहे. एमयुटीपीमधील प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडले आहेत. यामुळे कर्जत, कसारा, विरार आणि पनवेलवरून मुंबईत नोकरी-व्यवसायासाठी येणाऱ्या प्रवाशांना गर्दीतून घुसमटत प्रवास करावा लागत आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावावे यासाठी प्रवासी संघटनांनी आंदोलने केली, निवेदने दिली तरी काही प्रगती झाली नाही. यामुळे संतप्त प्रवाशी आणि संघटना रेल्वे प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन करणार आहेत .
लोकल विलंब-रखडलेल्या प्रकल्पाबाबत प्रवाशांचे २२ ऑगस्टला निषेध आंदोलन
