नवी दिल्ली – संसदेच्या लोकलेखा समितीच्या बैठकीला सेबी अध्यक्षा माधबी पुरी बुच आज आल्याच नाहीत. त्यामुळे ही बैठक ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली.सेबीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी माधबी बुच आणि सेबीचे अन्य उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित होते.मात्र बैठकीच्या काही तास आधी माधबी बुच यांनी तातडीच्या वैयक्तिक कामाचे कारण देत आपण बैठकीला राहू शकणार नाही,असे समितीला कळविले.याबद्दल बोलताना लोकलेखा समितीचे अध्यक्ष काँग्रेस नेता के सी वेणुगोपाल यांनी सांगितले की, समितीच्या बैठकीला आपण वैयक्तिक कारणामुळे हजर राहू शकत नाही,असे आज सकाळी माधबी बुच यांनी कळविल्याने बैठक पुढे ढकलण्यात आली. याआधी माधबी बुच यांनी समितीसमोर हजर राहण्यापासून सूट देण्याची मागणी केली होती. मात्र समितीने त्यांची मागणी फेटाळली.अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्च आणि काॅंग्रेसने केलेल्या आरोपांमुळे माधबी बुच वादात आल्या आहेत. हिंडेनबर्गने आरोप केलेल्या कंपन्यांमध्ये उद्योगपती गौतम अदानी समूहातील काही कंपन्या आहे. या कंपन्यांची चौकशी करताना माधबी बुच यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले असा आरोप आहे. त्याबाबत लोकलेखा समितीच्या आजच्या बैठकीत बुच यांना प्रश्न विचारले जाणार होते.