वॉशिंग्टन- अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसजवळील तीन जंगलांना मंगळवारी ७ जानेवारीला आग लागली. दीड दिवसात येथील आग तीन हजार एकर परिसरात पसरली. सर्वात आधी पॅसिफिक पॅलिसेड्स, ईटन आणि हर्स्टच्या जंगलात आग लागली आणि नंतर ती निवासी भागातही पसरली. यात पॅसिफिक पॅलिसेड्सचे सर्वाधिक नुकसान झाले. आगीमुळे ३० हजारांहून अधिक लोकांना घरे सोडावी लागली.
लॉस एंजेलिस प्रशासनाने संपूर्ण शहरात आणीबाणी जाहीर केली आहे. या भागात १ कोटी लोक राहतात. कॅलिफोर्निया प्रशासनाने जंगलात पसरलेल्या आगीमुळे येथील सुमारे ५० हजार लोकांना तातडीने घरे रिकामी करण्यास सांगण्यात आले. ३० हजारांहून अधिक लोकांनी घरे रिकामी केली आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. हेलिकॉप्टर आणि विमानांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र वादळी वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे. वाऱ्याची दिशा बदलत असल्याने आग सतत वेगवेगळ्या ठिकाणी पसरत आहे.