मुंबई -लोकसभेनंतर आता बारामती विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पवार कुटुंबियांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करताना शरद पवार म्हणाले की अजित पवार यांच्यामुळे मला आयुष्यात पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढावी लागली. तर मुलगी रेवती हिचा वाढदिवस असताना त्याच दिवशी सुनावणी असल्याने आपल्याला कोर्टात हजर राहावे लागले, असा भावनिक वार सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्याला आज अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. रेवतीचा वाढदिवस असताना तुम्ही कोर्टात कशाला गेलात, असा सवाल करत हे सारे लोकांची सहानुभुती मिळविण्यासाठी केले गेले, असा पलटवार अजित पवार यांनी केला.
एका कार्यक्रमात बोलतांना अजित पवार म्हणाले की, रेवती ही मलादेखील मुलीसारखीच आहे. तिचा वाढदिवस असताना तुम्ही घरी थांबायला हवे होते. वकिलाला सांगून सुनावणीसाठी पुढची तारीख तुम्ही मागून घेऊ शकला असता. पण तसे न करता लोकांची सहानुभुती मिळविण्यासाठी तुम्ही मुलीच्या वाढदिवसाला कोर्टात गेलात. लोकांच्या भावनांना हात घालण्याचा तुमचा प्रयत्न त्यातून स्पष्ट दिसतो, असे अजित पवार म्हणाले.
तत्पूर्वी, नातू युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडण्याच्या मुद्यावरून अजित पवार यांच्यावर टीका केली होती. अजित पवार यांच्यामुळे आपल्याला आयुष्यात पहिल्यांदाच न्यायालयाची पायरी चढावी लागली, असा नाराजीचा सूर शरद पवार यांनी लावला होता. पक्ष मी काढला. चिन्ह माझे होते. काही लोकांनी वेगळा खेळ केला. माझ्या आयुष्यात मी कधीच न्यायालयात उभा राहिलो नव्हतो. ती वेळ त्यांनी माझ्यावर आणली. शरद गोविंदराव पवार या नावाने मला पहिल्यांदा न्यायालयाचे समन्स आले,असे म्हणत अजित पवार यांनी आपल्याला कसे दुःख दिले हे सांगण्याचा शरद पवार यांनी प्रयत्न केला होता.
शरद पवार यांचे ते म्हणणेही खोडून काढण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. एकीकडे तुम्ही म्हणता जनतेच्या दरबारात जा, न्यायव्यवस्थेकडे जा, निवडणूक आयोग पक्ष फुटीवर जो निर्णय देईल तो मान्य करा. तुमच्या सांगण्यावरून आम्ही तशाच पद्धतीने गेलो तर आमचे काय चुकले, आम्हाला दोष का देता,असा सवाल करीत अजित पवार यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले,
लेकीच्या वाढदिवशी कोर्टात का? अजित पवारांचा सुप्रियावर वार
