मुंबई – लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून २४ ऑगस्ट ते २३ ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी विमा उतरवण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास त्यासाठी १२ कोटींचे विमा संरक्षण घेण्यात आले आहे. हा विमा न्यू इंडिया अश्यूरन्स कंपनीकडून उतरवण्यात आला असून मंडळाने यासाठी ५ लाख ४० हजार रुपयांचा विमा हप्ता भरण्यात आला आहे.
विजेच्या उपकरणांसाठी किंवा इतर गोष्टींमुळे हानी झाल्यास त्यासाठी अडीच कोटींचे विमा संरक्षण असेल. लालबागच्या राजाच्या गणेश मूर्तीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंसाठी ७ कोटी ४ हजार रुपयांचे विमा संरक्षण घेण्यात आले आहे. तर, याशिवाय प्रसादातून विषबाधा अशा प्रकारच्या घटनांसाठी ५ कोटींचे विमा संरक्षण असेल.
१२ कोटींच्या विमा संरक्षणामध्ये गणपतीचे भक्त, मंडळाचे विश्वस्त, नोंदणीकृत कार्यकारी सदस्य, स्वंयसेवक, स्थानिक रहिवासी, संरक्षण कर्मचारी, वॉचमन यांचा वैयक्तिक अपघात विमा काढण्यात आला आहे. एखादी अप्रिय घटना घडल्यास ५ लाखांची भरपाई मिळणार आहे. लालबागचा राजा मंडळाकडून ज्यांना ओळखपत्र दिली जातील ते यासाठी पात्र असतील, असे मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी सांगितले. दरम्यान, गेल्यावर्षी मंडळाने २५.६ कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते. गतवर्षी त्यासाठी ५ लाख २० हजार रुपये मंडळाकडून खर्च करण्यात आले होते.
लालबागच्या राजा गणेशाला २६.५ कोटींचे विमा संरक्षण
