पाटणा – मुंबईच्या लालबागचा राजा गणेशाची महती साऱ्या जगात आहे. ऑनलाईन माध्यमातून देशविदेशातील हजारो भक्त लालबागच्या राजाचे दर्शन घेत असतात. मात्र बिहारमधील गणेशभक्तांनी थेट पाटण्यात लालबागच्या राजाची स्थापना केली आहे. ही मूर्ती खास मुंबईहून आणण्यात आली असून यंदा या मूर्तीला या वर्षी ३० लाख रुपयांचा हिरेजडीत मुकूट अर्पण करण्यात आला आहे.
पाटण्यातील महाराष्ट्र मंडळाने यावर्षी गणेशोत्सवात लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना केली आहे. यासाठी लालबागच्या राजाची सहा फूट उंचीची मूर्ती मुंबईहून आणली आहे. पाटण्यातील दरोगा राय मार्गावरील मंडपात या गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. सजावट म्हणून अयोध्येतील राममंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली असून पाटण्यातील कारागिरांनी हा देखावा साकारला आहे. या मूर्तीला तब्बल ३० लाख रुपयांचा हिरेजडित मुकूट अर्पण करण्यात आला आहे. या मुकूटाची निर्मिती मुंबईतील रिलायन्स ज्वेलर्स यांनी केली आहे.
या गणेशोत्सव मंडळाचे सचिव संजय भोसले म्हणाले की, गणेश मूर्तीच्या मुकूटात ५ कॅरेट हिरे तसेच ५० पेक्षा अधिक मौल्यवान रत्ने जडलेली आहेत. महाराष्ट्र मंडळातर्फे गेली ५४ वर्षे हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या वर्षी बिहारचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर निमंत्रित करण्यात आले असून ते १२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला भेट देणार आहेत. गणेशोत्सवात दररोज विशेष आरतींचे आयोजन करण्यात आले आहे. निमंत्रितांना फेटे बांधण्यासाठी खास सांगलीतून फेटे बांधणाऱ्यांना त
सेच ढोलपथकाला पाचारण करण्यात आले आहे. या गणेसोत्सवात मुंबईतील कलाकारांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून गणेशाचे विसर्जन १३ सप्टेंबरला होणार आहे.