मुंबई- आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन महायुती सरकारमधील सगळेच घटक पक्ष सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जोरजोरात प्रचार करत आहेत. महिलांना आकर्षित करण्यासाठी हा आटापिटा सुरू असताना या योजनेच्या श्रेयावरून महायुतीतील पक्षांतच चुरस लागली आहे. अजित पवारांनी या योजनेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे योजनेच्या व्हिडिओ आणि जाहिरातीतून त्यांनी सरळ ‘मुख्यमंत्री’ हा शब्दच काढून टाकला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने लाडकी बहीण योजनेचे एक पोस्टर आणि व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यात राष्ट्रवादीने मुख्यमंत्री हा शब्द वगळून केवळ माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख केला आहे .या पोस्टर व जाहिरातीत महायुतीच्या इतर नेत्यांना स्थान न देता केवळ राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवारांची छबी आहे. दादाचा वादा, लाभ आणि बळ असेही पोस्टरवर लिहिले आहे. अजित दादा महसूल मंत्री आहेत, त्यांनीच ही योजना मंजूर केली, त्यांनाच या योजनेचे श्रेय आहे अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून काल बारामतीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी झळकवलेले बॅनर व जाहिरातींमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी योजना’ असे न दाखवता जणू ही अजित पवार लाडकी बहीण योजना आहे, असे सादरीकरण करण्यात आले आहे. तशाच पद्धतीने योजनेचे नाव दाखवण्यात आले आहे. या जाहिरातीत दादाचा वादा लाभ आणि बळ असेही लिहिण्यात आले आहे. या योजनेबाबत अजित पवार यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्येही, माझी बहीण होणार स्वावलंबी,स्वतः च्या पायावर उभी राहणार! तिला बळ देण्यासाठी ‘माझी लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख आहे. यातून अजित पवार यांच्याकडून जास्तीत जास्त महिलांना आपल्या पक्षाकडे आकृष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अजित पवार गटाने हे जाणीवपूर्वक केल्याची शिंदे गटाच्या शिवसेनेची भावना झाली असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातून नाराजी पसरते आहे असे शिंदे गटाचे म्हणणे आहे.
अजित पवार गट मात्र यात काहीच चुकीचे नसल्याची भूमिका मांडत आहे. या गटाचे प्रवक्ते उमेश पाटील या संदर्भात म्हणाले की, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या नावाने अनेक योजना आहेत. त्यामुळे या योजनेच्या फलकावर केवळ शॉर्टकट म्हणून लाडकी बहीण योजना एवढेच छापले गेले. तो कार्यक्रम अजित पवार यांचा होता. त्यामुळे त्यांचे नाव आले. अजित पवारांचे नाव देण्यात काही गैर नाही. कारण अर्थसंकल्पात अजित पवार यांनीच ही योजना मांडली होती. इतर सगळीकडेच म्हणजे अर्ज व इतर साहित्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी योजना असेच छापलेले आहे. या योजनेचे फॉर्म भरताना त्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असाच उल्लेख आहे. ऑनलाईनही तेच नाव आहे. अजित पवारांना या योजनेचे श्रेय घ्यायचेच असते तर त्यांनी ही योजना यशवंतराव चव्हाण लाडकी बहीण योजना किंवा आधीच माझी लाडकी बहीण योजना म्हणून मांडली असती. पण त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्राधान्य दिले. केवळ एकाच कार्यक्रमापुरता हा शॉर्टकट वापरण्यात आला.
शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट मात्र म्हणाले की, आमच्यात यावरून कोणतीही नाराजी नाही. मात्र मित्रपक्षांनी असे काही करू नये जेणेकरुन गैरसमज निर्माण होतील. ही योजना अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून बजेटमध्ये मांडली असली तरी मंत्रिमंडळातील कोणीही मंत्री असो, त्यांचे प्रमुख हे मुख्यमंत्रीच असतात. मुख्यमंत्र्यांना वाटले असते तर त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे नाव दिले असते. तुम्हाला हवे असल्यास तुमच्या मतदारसंघात या योजनेबरोबर तुमचे मोठे फोटो लावा. आमचे काही म्हणणे नाही. परंतु गैरसमज निर्माण होतील, असा बदल नावात करू नका.