मुंबई – राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आज महायुतीने आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत गेल्या दोन-अडीच वर्षांत सरकारने घेतलेल्या निर्णयांचा पाढा मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी वाचला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा समाचार घेताना, लाडकी बहीण योजनेला टच कराल तर तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीला उद्देशून दिला. या पत्रकार परिषदेत सरकारने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या विकास कामांचे संक्षिप्त रिपोर्ट कार्ड महायुतीने सादर केले.
या रिपोर्ट कार्डवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांची आणि विकास कामांची भलावण केली. ते म्हणाले की कार्ड जाहीर करायला हिंमत लागते. कारण मुळात रिपोर्ट कार्ड दाखवताना कामे करावी लागतात. आम्ही तशी असंख्य कामे केली आहेत. त्या सर्व कामांची जंत्री द्यायची झाल्यास रिपोर्ट कार्डच्या ऐवजी मोठी पुस्तिकाच छापावी लागेल. गेल्या सव्वा दोन वर्षांच्या काळात कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या 60-70 बैठका झाल्या. या बैठकांमध्ये तब्बल 900 निर्णय घेण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकाला या निर्णयांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे’.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की तुम्ही रिपोर्ट कार्डमध्ये लिहिणार? आम्ही हा प्रकल्प बंद केला, हा निर्णय रद्द केला, तो निर्णय रोखला, असे काही रिपोर्ट कार्डमध्ये कसे काय लिहिणार, असा चिमटाही शिंदे यांनी विरोधकांना उद्देशून काढला. अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, मुंबई-नागपूर समृध्दी महामार्ग, वाढवण बंदर असे प्रकल्प ही अवघ्या दोन सव्वादोन वर्षांत महायुती सरकारने केलेली नेत्रदीपक कामगिरी आहे. त्याची जाण जनता येणार्या निवडणुकीत नक्कीच ठेवेल.
मराठा आरक्षणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ओबीसीला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले. पण या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाणारे कोण होते हे सारेच जाणतात. मराठा समाजासाठी आम्ही महामंडळ स्थापन केले.
पत्रकार परिषदेची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. अजित पवार यांनी देखील विरोधकांकडून विविध योजनांवर होत असलेल्या टीकेचा समाचार घेतला. आम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर विरोधक टीका करतात. लाडकी बहीण सारख्या योजनेची खिल्ली उडवतात. टवाळी करतात. पण आम्ही ही योजना पूर्ण विचार करूनच लागू केली आहे. त्यामुळे ती निवडणुकीनंतरही सुरूच राहणार आहे. विरोधक केवळ फेक नरेटीव्ह पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमच्या सरकारच्या कामाच्या धडाक्यामुळे विरोधक गडबडून गेले आहेत, असे अजित
पवार म्हणाले.
भाजपा नेते उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महायुती सरकारने केलेल्या विविध विकास कामांचा पाढा वाचला. त्याबरोबर महाविकास आघाडीच्या सरकारची ’स्थगिती सरकार’ अशा शब्दात खिल्ली उडवली. महाराष्ट्रात स्थगिती सरकार जाऊन आता गती आणि प्रगतीचे सरकार आले आहे,असे फडणवीस म्हणाले.शेतकर्यांना परवडणार्या किमतीत वीज उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे,असा दावा फडणवीस यांनी केला. महाराष्ट्रात येऊ पाहाणारे अनेक प्रकल्प गुजरातला नेल्याचा विरोधक करीत असलेला आरोपही त्यांनी फेटाळून लावला. उद्योग क्षेत्राच्या बाबतीत देशातील सर्व राज्यांची तुलना केली तर महाराष्ट्र हे नंबर एकचे राज्य आहे. मात्र विरोधक विनाकारण गुजरातचा प्रचार करीत आहेत, असा टोला फडणवीस यांनी हाणला.
‘लाडकी बहीण’ योजनेला टच केला तर कार्यक्रम करणार महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा मविआला इशारा
