सोलापूर- सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात लाडकी बहीण योजनेचे काम करताना सुरेखा अंतःकरण या अंगणवाडी सेविकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याचे काम सुरू असताना सुरेखा यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
मोहोळ तालुक्यातील देगाव येथील अंगणवाडी क्रमांक १ मध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याचे काम सुरू होते. यावेळी सुरेखा यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्या खुर्चीवर कोसळल्या. आरडाओरड झाल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी अंगणवाडीकडे धाव घेत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सुरेखा यांना तातडीने मोहोळ मधील सरकारी दवाखान्यात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, सुरेखा यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथामिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. शवविच्छेदनानंतर या घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सुरेखा यांच्या निधनामुळे संपूर्ण देगाव गावावर शोककळा पसरली आहे. सुरेखा यांच्या पार्थिवावर देगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.