सांगली- राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरात तालुकास्तरीय अशासकीय समित्या स्थापन केल्या आहेत. मात्र सांगली जिल्ह्यात अशा समित्यांमध्ये पालकमंत्री सुरेश खाडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील सदस्यांना डावलले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश चोथे यांनी केला आहे.
अविनाश चोथे यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.चोथे यांनी म्हटले आहे की,शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने राज्यात ‘लाडकी बहिण ‘ योजना घोषित करण्यात आली आहे.या योजनेच्या जीआरमध्ये प्रत्येक तालुक्यात समिती स्थापन करावी असे नमूद करण्यात आले आहे.या समितीमध्ये अशासकीय सदस्य,अध्यक्ष व दोन सदस्य नेमले जाणार आहेत.सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अशा समित्या नेमल्या आहेत.मात्र एकाही तालुक्यातील समितीमध्ये भाजपाने मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या एकाही सदस्याला समाविष्ट करून घेतलेले नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केवळ भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचीच नावे आहेत. भाजपने मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेला हा अन्याय असल्याचा आरोप अविनाश चोथे यांनी केला आहे.