पुणे – आज लाडकी बहीण योजनेच्या आनंद सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार या ‘तीन लाडक्या भावांनी’ भाषणात एकच आवाहन केले की, ही योजना सुरू राहावी असे वाटत असेल तर महायुतीच्या सरकारला पुन्हा सत्तेवर आणा. मुख्यमंत्र्यांनी तर असेही सांगितले की, महायुतीचे सरकार पुन्हा आणले तर ही दीड हजाराची रक्कम तीन हजारपर्यंत जाऊ शकते. आजच्या कार्यक्रमातून महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.
पुण्यातील बालेवाडीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, विधान परिषद उपसभापती यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बहिणींच्या डोळ्यात आमच्याबद्दल आदर पाहिला. आम्हाला तेवढेच पाहिजे होते. लाडक्या बहिणींसह आम्ही लाडक्या भावासाठीही योजना आणल्या. मात्र, सावत्र भाऊ या योजनेत खोडा घालायचा म्हणून कोर्टात गेले. कोर्टानेही त्यांची याचिका फेटाळली. त्यांनी या योजनेविरोधात भरपूर अपप्रचार केला. या कपटी सावत्र भावांना योग्य वेळी त्यांची जागा दाखवा. खोडा घालणार्यांना संधी येईल तेव्हा त्यांना जोडा दाखवा. मला त्यांना एवढेच सांगायचे आहे की, बाकी सगळा नाद करा, पण या योजनेचा नाद करायचा नाही. गाठ माझ्याशी आहे. आम्हा भावांशी आहे.
विरोधकांनी सत्तेत असताना 60 वर्षांत महिलांना एक पैसा दिला नाही. आम्ही अन्नपूर्णा योजना, लखपती योजना, वर्षाला तीन सिलिंडर योजना आणल्या. या सरकारला आशीर्वाद देत राहिलात तर दीड हजाराचे तीन हजार होतील. ताकद आली तर आणखी देताना हात आखडता घेणार नाही. देण्यासाठी दानत लागते. ती आमच्याकडे आहे. आता ज्या महिलांच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत, त्या महिलांच्या खात्यावरही घरी जाईपर्यंत पैसे जमा होतील. ज्यांचे आधार लिंक राहिले असेल त्यांनाही पैसे मिळेल. 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. सप्टेंबरमध्ये अर्ज भरला तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळतील. तुम्हाला दर महिन्याला दीड हजाराचा माहेरचा आहेर मिळणार आहे, असेही शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अख्खा महाराष्ट्र आज माझी बहिणीमय झाले आहे. महाराष्ट्रातील महिला सक्षम व सबल झाली पाहिजे हा आमचा हेतू आहे. विरोधक कारण नसताना टीका करतात. भावांकरिता आम्ही वीज मोफत दिली, प्रशिक्षणार्थींना वेतन दिले, दुधाला अनुदान दिले. आमच्या सरकारचे पाच महिने आहेत. त्यात साडेसात हजार रुपये मिळतीलच. पण यात सातत्य ठेवायचे आहे. त्यासाठी मायमाऊलींनो पुढील पाच वर्षांसाठी आमचे सरकार निवडून आणा. या पाच वर्षांत 90 हजार रुपये तुमच्या खात्यात द्यायचे आहेत. त्यामुळे यावेळी विरोधकांचे ऐकू नका. वीज माफी, मुलींना मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती, माझी लाडकी बहीण या योजना पुढे सुरू ठेवायच्या की नाही हे तुमच्या हातात आहे. धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ लक्षात ठेवा,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही खटाखट योजना नाही. ही फटाफट योजना आहे, सावत्र भावांनी पोर्टलमध्ये अडचणी आणल्या. तेव्हा आम्ही फॉर्म भरून घेतले. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही महिलांसाठी अनेक योजना आणल्या. ज्यामुळे महिलांना आर्थिक प्रवाहात आणले. मोदींचे आभार मानायला हवेत. कारण त्यांनी डीबीटी योजना आणल्याने दलालाशिवाय पैसे थेट खात्यात गेले. बहिणीचे प्रेम विकत घेता का, म्हणणार्या नालायकांनो, तुम्हाला बहिणीचे प्रेम समजू शकत नाही. मायमाऊली आम्हाला आशीर्वाद देत आहेत, पण अजित पवार म्हणतात ते खरे आहे. मी मुख्यमंत्री असताना ज्या योजना आणल्या त्या यांचे सरकारवर आल्यावर त्यांनी सर्व योजना रद्द केल्या. निवडणुकीत वेगळे काही झाले तर हे योजना बंद करतील. जिथे यांचे सरकार नाही त्या कर्नाटकात, तेलंगणात योजना बंद आहेत किंवा चालूच झालेल्या नाहीत. संसदेत आणि विधानसभेत लवकरच महिला राज येणार आहे. त्याच दिशा ठरवणार आहेत. म्हणून आम्हीही महिलांना भरभरून देत आहोत.
खा. सुप्रिया सुळेंनी
सत्ताधार्यांना सुनावले
‘लाडकी बहीण’च्या आजच्या कार्यक्रमासाठी लाभार्थी महिलांना पाठवलेल्या मेसेजवरून खा. सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाहीत तर तुमचे अर्ज रद्द करू, अशी धमकी संदेशाद्वारे महिलांना देण्यात आल्याचे सांगत खा. सुळेंनी सरकारला सुनावले की, लाडक्या बहिणीला धमक्या देऊ नका, कार्यक्रमाला न जाणार्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवाच.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले की, लाडकी बहीण योजनेची रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणार्या बहिणींचे अर्ज रद्द करण्याचे धमकी देणारे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवितात. कार्यक्रमाला बहिणींची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेतात. सत्तेत बसलेल्या भावांनो, बहीण-भावाचे नाते एवढे स्वस्त नसते. बहिणींना प्रेमाने काही मागितले तर बहीण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणार्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवाच.