अहिल्यानगर- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. लाडकी बहीण योजनेचे पाच हफ्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा खूप मोठा वाटा होता. मात्र या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. त्यामुळे सरकारने आम्हाला आमच्या कामाचा मोबदला द्यावा, अशी महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी सेविकांच्या वतीने मागणी करणायात आली आहे.
अहिल्यानगरातील ५ हजार १८३ अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेची जबाबदारी देण्यात आली होती. त्यासाठी प्रत्येक अर्जामागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने जाहीर केले होते. प्रत्येक अंगणवाडी सेविकेने दोनशे ते तीनशे अर्ज भरलेले आहेत. मात्र, जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला असला तरी, अंगणवाडी सेविका अद्यापि प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे म्हणाले की, सध्या त्यांची जिल्हास्तरावर माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे. माहिती उपलब्ध झाल्यास त्यांना लगेच प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.