मुंबई – सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला सध्या विरोधकांकडून विरोध केला जात असून, ही योजना राबवण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसेच नाहीत, असा आरोप केला जात आहे. मात्र, या योजनेसाठी अर्थसंकल्पात आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे सदर योजनेसाठी पैसा कुठून आणणार? हा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी एक्स पोस्टद्वारे देत विरोधकांच्या प्रचाराला ठणकावून उत्तर दिले.
अजित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे, राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण असूच शकत नाही. या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या यशासाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करण्याचे आवाहनही अजित पवारांनी केले.
1 जुलैपासून सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेवरून विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहेत. या योजनेमुळे 46,000 कोटी रुपयांचा भार सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. शिवाय राज्याच्या डोक्यावर सध्या 80,000 कोटींचे कर्ज असल्याने वित्त विभागाचाच विरोध असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यावरून ही योजना राबवायला सरकार पैसा कुठून आणणार, तिजोरीत पैसे नसताना ही उधळपट्टी कशासाठी, असे विरोधक सवाल करत आहेत. ही योजना निवडणुकीपुरती राबवली जाईल आणि नंतर बंद केली जाईल, असा आरोप ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी केला आहे.
‘लाडकी बहीण’बद्दल खोटे पसरवू नका दादा कडाडले! 35 हजार कोटी ठेवलेत
