लाडकी बहीणनंतर भावांवर खैरात! बेरोजगार तरुणांना 8500 महिना

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपने लाडक्या बहिणींना खूश करत दरमहा 2,100 रुपये देण्याचे आश्वासन देणारी योजना जाहीर केल्यावर काँग्रेसही आता भावांसाठी सरसावली आहे. आज काँग्रेसने दिल्लीच्या मतदारांसाठी आपल्या तिसर्‍या गॅरंटीची घोषणा केली. ‘युवा उडान योजना’ असे नाव असलेली ही योजना तरुणांसाठी असून, सरकार आल्यास, काँग्रेस बेरोजगार तरुणांना एक वर्षासाठी दर महिन्याला प्रशिक्षणार्थी म्हणून 8500 रुपये मदत देणार आहे. यापूर्वी काँग्रेसने महिलांना प्यारी दीदी योजनेखाली दर महिन्याला 2,500 रुपये देण्याची घोषणा केली आहे. तर जीवन रक्षा योजनेअंतर्गत दिल्लीतील नागरिकांना मोफत उपचार दिले जाणार आहेत.
काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राजधानी दिल्लीत ही घोषणा केली. त्याआधी दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख देवेंद्र यादव यांनी काल सोशल मीडियाद्वारे, सचिन पायलट दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यालयात एक मोठी घोषणा करणार असल्याची माहिती दिली होती. सचिन पायलट म्हणाले की, आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. ते तरुणांचे प्रेरणास्रोत होते. दिल्लीतील तरुणांकडे सध्या केंद्र आणि राज्य सरकार यांच्यापैकी कुणाचेच लक्ष नाही. इतिहास याचा साक्षीदार आहे की, जेव्हा जेव्हा दिल्लीत काँग्रेसचे सरकार येते, तेव्हा दिल्लीच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. आम्ही ज्या जबाबदारीने आश्वासने देतो, त्याच जबाबदारीने ती पूर्णही करतो, हे लोकांना ठाऊक आहे. 5 फेब्रुवारीला दिल्लीचे लोक कुणी काय आश्वासन दिले, हे लक्षात ठेवूनच मतदान करतील.
रोजगार निर्मिती ही कोणत्याही सरकारची पहिली प्राथमिकता असायला हवी, पण केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांनी बेरोजगारांकडे दुर्लक्ष केले. सुशिक्षित मुलांना रोजगार द्यायला हवा होता. मात्र संधी मिळूनही दोन्ही सरकार काही करू शकली नाहीत. काँग्रेसने नेहमीच लोकांसाठी काम केले. काँग्रेस सरकारने आयटी क्षेत्रात उत्कृष्ट काम केले. मी स्वतः त्या खात्याचा मंत्री होतो. आज दिल्लीत केवळ आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण होत आहे, पण आता लोकांना चांगला पर्याय हवा आहे. येत्या निवडणुकीत जनता काँग्रेस पक्षाला निवडून देईल आणि सरकार स्थापन करेल, अशी आशा आहे. दिल्लीत काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना एक वर्ष प्रशिक्षण आणि दरमहा 8,500 रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या एका वर्षात तरुणांनी त्यांची कार्यक्षमता वाढावी आणि ज्या क्षेत्रात त्यांना प्रशिक्षण दिले आहे, त्याच क्षेत्रात पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसने सर्वप्रथम महिलांसाठी सन्मान निधीची घोषणा केली होती. यात, सरकार स्थापन झाल्यानंतर ‘प्यारी दीदी योजने’अंतर्गत महिलांना दरमहा 2500 देण्याचे आश्वासन देण्यात आले आहेे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी गेल्या आठवड्यात ही घोषणा केली होती. यानंतर काँग्रेसने दिल्लीच्या नागरिकांसाठी 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचे आश्वासन दिले होते. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिल्लीत ही घोषणा केली होती. या हमीला जीवन रक्षा योजना, असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेस आधी आपने निवडणुकीनंतर महिलांना दरमहा देण्यात येणारी रक्कम 2,100 रुपये देणार्‍या नारी सन्मान योजना जाहीर केली आहे. याव्यतिरिक्त रिक्षा चालकांच्या मुलीच्या लग्नासाठी 1 लाख रुपये, होळी आणि दिवाळीला गणवेश घेण्यासाठी अडीच हजार रुपये, 10 लाख रुपयांचा जीवन विमा आणि 5 लाख रुपयांचा अपघाती विमा, मुलांच्या प्रशिक्षणासाठी पैसे, ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार अशा अनेक लोकप्रिय घोषणा केल्या आहेत. आप आणि काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांमुळे भाजपाही आपल्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस पाडेल, अशी शक्यता म्हटले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top