धुळे – लाडकी बहीण योजनेने निवडणुकीच्या काळात महायुतीला मोठे यश मिळवून दिले होते. मात्र, निवडणूक होताच अर्जांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत दोन दिवसांपूर्वी घोषणा करताच निकष डावलून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. धुळ्यात एका लाभार्थी महिलेला मिळालेले 7500 रुपये पुन्हा सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहेत. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत.
धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील रहिवाशी असणार्या भिकुबाई प्रकाश खैरनार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपला अर्ज केला होता. मात्र हा अर्ज भरल्यानंतर संबंधित अर्जासाठी आधार कार्ड जोडताना भिकूबाई यांचे आधार कार्डऐवजी आपला मुलगा योगित खैरनारचे आधार कार्ड आणि बँकेचे खाते जोडले होते. त्यांच्या मुलाच्या नावे असलेल्या या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये जमा झाले होते. मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर योगितने हे पैसे आपल्या खात्यावर कसे आले याबाबत चौकशी केली असता, आपले आधार कार्ड आईच्या अर्जासोबत जोडले गेल्याचा प्रकार त्याच्या लक्षात आला. याबाबत अधिक चौकशी करण्याकरता खैरनार कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला. संबंधित विभागाच्या अधिकार्यांनीदेखील याची तत्काळ दखल घेत त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून एका चलनाद्वारे योगितच्या खात्यावर आलेले पैसे शासनाकडे पुन्हा जमा केल्याची माहिती भिकूबाई यांनी दिली. दरम्यान, सरकारने पैसे परत घेतल्याच्या वृत्तानंतर विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले. खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘लाडक्या बहिणी आणि सरकारमधील हा विषय आहे. आम्ही लाडक्या बहिणींमुळे जिंकलो असे सरकारचे म्हणणे आहे. पण आता ज्यांचे पैसे परत घेणार आहात त्यांची मतेही परत द्या. हा विषय अत्यंत गंभीर आहे. यात मोठा घोटाळा झालेला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी झालेला हा प्रकार होता. भविष्यात ही योजना राहील की नाही, यात संशय आहे.
तर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली, सरसकट सर्वांना त्याचा लाभ दिला, मते घेताना कोणतेही निकष लावले नाही आणि आता निकष लावून लाडक्या बहिणींची फसवणूक केली जात आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकर्यांसाठी काही वर्षांपूर्वी एक योजना आणली होती. सुरुवातीला शेतकर्यांना पैसे मिळाले. परत टप्प्याटप्प्याने 70 टक्के शेतकर्यांचे पैसे थांबले. आता निवडणुका झाल्या. भाजपा व मित्र पक्षाला बहुमत मिळाले. आता हळूहळू आमच्या लाडक्या बहिणींना वंचित ठेवतील. अनेक बहिणी वंचित आहेत. तर ज्यांना लाभ मिळाला त्यांचा अर्ज बाद करण्यात येत आहे. पण आम्ही लाडक्या बहिणींसोबत आहोत.
दरम्यान, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी, असा खुलासा केला की, धुळ्यातील भिकूबाई प्रकाश खैरनार यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा त्यांच्या स्वतःच्या बँक खात्याऐवजी त्यांच्या मुलाच्या आधार कार्डला संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा झाल्याने तो बंद करून मिळालेली रक्कम सरकारला परत करण्याबाबत त्यांचा अर्ज प्राप्त झाला आहे. मात्र, या घटनेचा संदर्भ देत महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जात आहे, अशा आशयाचे चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले जात आहे. अशा चुकीच्या माहितीला आपण बळी पडू नये ही विनंती. अशाप्रकारे कोणतीही सरसकट अर्जाची फेरछाननी सुरू नाही.