लाखो वर्षांनी अवकाशात चमकदार धूमकेतू दिसणार

वॉशिंग्टन- पुढील काही दिवसांमध्ये अवकाशात एक चमकदार धूमकेतू पाहायला मिळणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने याबाबतची माहिती दिली आहे.या धूमकेतूचे नाव ‘सी २०२४ जी ३’
(अ‍ॅटलस ) असे आहे.तो इतका चमकदार आहे की, केवळ उघड्या डोळ्यांनीही आकाशात दिसू शकेल.
खगोलशास्त्रज्ञ आणि अवकाश प्रेमींसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे. हा धूमकेतू परवा सोमवारी सूर्याच्या सर्वात जवळच्या ‘पेरिहेलियन’ बिंदूवर होता. या बिंदूने हे निश्चित होते की तो किती चमकदार दिसेल. आकाशात नेमक्या कोणत्या ठिकाणी तो दिसेल हे अद्याप स्पष्ट नाही.उत्तर गोलार्धाच्या तुलनेत तो दक्षिण गोलार्धात अधिक चांगल्या प्रकारे दिसेल,असा अंदाज आहे. ‘नासा’चे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून घेतलेला या धूमकेतूचा फोटो सोशल मीडियात शेअर केला आहे. त्यांनी लिहिले आहे,पृथ्वीच्या कक्षेतून एखाद्या धूमकेतूला पाहणे अतिशय आश्चर्यकारक अनुभव आहे. अ‍ॅटलस सी २०२४ – जी ३ आम्हाला भेटण्यासाठी आला आहे. हा धूमकेतू शुक्राच्या चांदणीइतका चमकदार दिसू शकतो.या धूमकेतूला गेल्या वर्षी नासाच्या अ‍ॅस्टेरॉईड अलर्ट सिस्टीममधून पाहण्यात आले होते.सध्याच्या गणनेनुसार हा संकेत मिळतो की, तो सूर्यापासून सुमारे १.३३ कोटी किलोमीटर अंतरावरून जाईल.दक्षिण गोलार्धातून तो पूर्व दिशेला क्षितिजावर पाहता येईल.मात्र भारतासह उत्तर गोलार्धातील देशांमधील लोकांना तो पाहता येणे अवघड आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top