लसूण काकडीचे भाव वाढले फ्लॉवर, कोबी, वांगी स्वस्त

पुणे

थंडीमुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात काकडीची आवक निम्म्यावर आली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने काकडीच्या भावात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील स्थानिक बाजारपेठांमध्ये लसणाची आवक कमी होत असल्याने पुण्यातील बाजारपेठेतही लसणाची आवक मंदावली आहे. त्यामुळे लसणाचे भावही १० टक्क्यांनी वाढले आहेत.

ढगाळ वातावरणामुळे कोबी, फ्लॉवर व वांगीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने या फळभाज्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. बाजारातही मोठ्या प्रमाणात या फळभाज्या येत आहेत. या तुलनेत ग्राहकांकडून या भाज्यांना मागणी कमी असल्याने कोबी, फ्लॉवर व वांगीच्या भावात १० टक्क्यांनी घसरण झाली आहे. उर्वरित सर्व फळभाज्यांचे मागील आठवड्यातील भाव टिकून आहेत. गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये काल राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ते १०० फळभाज्यांचे ट्रक आले. यात हिरवी मिरची, कोबी, शेवगा, गाजर, घेवडा, भुईमुग, मटार, पावटा, लसूण या भाज्यांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top