नाशिक- ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्याकडून पुणे पोलिसांनी आणखी ५ किलो सोने जप्त केले आहे. यापूर्वी तीन किलो सोने जप्त करण्यात आले होते. काल पुणे पोलिसांची एक तुकडी ललितला घेऊन नाशिकला गेली होती. तेथे त्यांनी हे सोने जप्त केले. ललितने अंमली पदार्थ विकून लाखो रुपये कमवले होते. या पैशांचे त्याने सोने घेतले होते, त्याचबरोबर काही रक्कम त्याच्या दोन मैत्रिणींकडे ठेवण्यासाठी दिली होती. ललितने एका व्यक्तीकडे हे सोने ठेवण्यासाठी दिले होते.
याशिवाय ललित व त्याच्या १२ साथीदारांवर पुणे पोलिसांकडून मोक्काअंतर्गत कारवाई सुरु करण्यात आली आहे. अरविंदकुमार लोहरे आणि ललित हे दोघे त्यांच्या टोळीचे प्रमुख होते. लोहरे एमडी बनवण्यात माहीर होता. दरम्यान, ललितची नार्को टेस्ट केली पाहिजे, मगच सगळी नावे समोर येतील. तसेच दुसऱ्या बाजूला ललितच्या जीवाला धोका असून त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया कसबा आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे. या प्रकरणासंदर्भात ससून रुग्णालयात स्थापन केलेली समिती बोगस आहे, असा आरोप देखील धंगेकर यांनी केला आहे. ललितसह शिवाजी शिंदे, रोहित कुमार चौधरी या तिघांना पुणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ललित पाटीलकडून पोलिसांनी आणखी ५ किलो सोने जप्त केले
