सांगली- तासगाव – सांगली रस्त्यावरील कुमठे फाटा परिसरातील वळण रस्त्यावर दुचाकी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात आईसह दोन चिमुकली मुले जागीच ठार झाली तर पती केवळ हेल्मेटमुळे बचावला असून तो गंभीर जखमी झाला. काल सकाळी सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातातील मृतांची नावे आई दीपाली विश्वास म्हारगुडे (२७), मुलगा सार्थक (७) आणि राजकुमार (५) अशी आहेत.
पती दुचाकीस्वार विश्वास दादासो म्हारगुडे (३१) यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघातानंतर तासगाव येथील जीप चालक नीतेश ऊर्फ नाट्या कोळेकर हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.जखमी विश्वास म्हारगुडे मोलमजुरी करतो. तो मूळचा आटपाडी तालुक्यातील तळेवाडी येथील आहे.कामानिमित्त तो सांगलीतील आंबा चौक परिसरात राहण्यास आहे. तळेवाडी येथील एका नातेवाइकाच्या लगनासाठी नऊ वाजता तो आणि पत्नी-मुलांसह दुचाकीवरून तासगाव मार्गे निघाले होते. कुमठे फाट्याजवळील एका पेट्रोलपंपाजवळ समोरून सांगलीच्या दिशेने येणाऱ्या प्रवासी जीपने ओव्हरटेक करण्यासाठी जीप रस्त्याच्या विरुद्ध बाजूला घेतली.समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार विश्वास याला त्याचा अंदाज आला नाही.क्षणात दोघांची समोरासमोर धडक झाली.मागे बसलेली पत्नी दीपाली आणि मुले सार्थक व राजकुमार हे तिघेही गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले.तर विश्वास म्हारगुडे हा हेल्मेट घातल्यामुळे जोरदार धडक बसूनही बचावला. मात्र त्याच्या पायाला,पोटाला गंभीर दुखापत झाली आहे.