नाशिक – वर्षभरापूर्वी अंतरवालीत झालेल्या लाठीमारावेळी पोलीस कारवाईनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील तिथून निघून गेले होते. यानंतर रात्री दोन वाजता रोहित पवार आणि स्थानिक आमदार राजेश टोपे हे अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी आले आणि त्यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा त्याठिकाणी बसवले, असा आरोप अजितदादा गटाचे नेते आणि मित्र छगन भुजबळ यांनी केला. ते आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे अंतरवालीत ज्यावेळी दगडफेक झाली. त्यानंतर लाठीमार झाला तेव्हा मनोज जरांगे तिथून निघून गेले होते. परंतु, रात्री दोन वाजता रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा तिकडे आणून बसवले. यानंतर तिकडे शरद पवार गेले, मग उद्धव ठाकरे हेदेखील गेले. शरद पवार आणि उद्धव साहेबांना पोलिसांवर दगडफेक झाल्याची कल्पना नव्हती. आंदोलकांच्या दगडफेकीत ८० पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांनी अंतरवाली सराटीत स्वसंरक्षणासाठी लाठीमार केला, हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना माहिती नव्हते. अंतरवाली सराटीमध्ये घडलेल्या दगडफेकीत रोहित पवार आणि राजेश टोपे यांचा वाटा आहे, असे तेथील लोक सांगत आहेत.