नवी दिल्ली – देशात सर्वसाधारणपणे रोज घेण्यात येणारी 48 हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरली आहेत. केंद्रीय औषध गुणवत्ता नियंत्रण संस्थेने (सीडीएससी) नुकत्याच घेतलेल्या चाचणीत ही औषधे गुणवत्तेच्या मानकांना अनुरूप ठरलेली नाहीत. त्यामुळे ही औषधे घेणे आरोग्यास हानीकारक आहेत, असा निष्कर्ष निघाला आहे.
ताप आणि वेदनाशामक पॅरासिटिमॉल इंटेमॉल 500, अॅसिडीटीवरील पॅन डी, कॅल्शियम व ‘ड’ जीवनसत्त्वासाठीचे शेलकॅल 500, अॅण्टीबायोटिक क्लॅवम 625 ही औषधे सामान्यपणे जवळजवळ प्रत्येक घरात घेतली जातात. ही औषधे तपासली तेव्हा त्यांची गुणवत्ता अयोग्य आढळल्याने ती घेणे आरोग्यास हानीकारक आहेत, असा निष्कर्ष निघाल्याने धक्काच बसला आहे. कॅल्शियम कमी पडेल म्हणून महिला विशेषतः शेलकॅल घेतातच. अनेकांच्या पाकिटात अॅसिडिटीवर उत्तम म्हणून पॅन डी ची स्ट्रीप असते. आता काऊंटरवर मिळणारी आणि सतत लागणारी अशी 48 औषधे जर दर्जाहीन असतील तर नेमके करायचे काय हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ वाजलेला असताना आता औषधात उत्पादनाच्या ठिकाणीच जर घोटाळे होऊ लागले तर ती चिंतेची बाब आहे. औषध निर्मितीवर काटेकोर लक्ष ठेवणे अधिक गरजेचे ठरणार आहे.
या यादीतील ग्लिमेपिराइड हे मधुमेहासाठी वापरण्यात येणारे हे औषध आहे. टेल्मा एच हे ग्लेनमार्कचे औषध उच्च रक्तदाब म्हणजे ब्लडप्रेशरच्या उपचारासाठी दिले जाते. सेपोडेम या औषधाचा लहान मुलांमधील बॅक्टेरियावर उपचार म्हणून वापर केला जातो. पल्मोसिल हे सन फार्माद्वारे बनवलेले हे औषध नपुंसकतेवर वापरले जाते. डेफकोर्ट-6 हे औषध संधीवातावर घेतले जाते. या औषधांची गुणवत्ताही कमी सापडल्याने त्यांच्या वापरामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
केंद्रीय गुणवत्ता नियंत्रक अर्थात सीडीएससीओ संस्थेने अपेक्षित दर्जा प्राप्त न केलेल्या 48 औषधांची यादी जारी केली आहे. इतर 5 औषधांबाबत उत्पादक कंपन्यांबरोबर वाद सुरू आहे. गेल्या महिन्यात औषधांच्या काही बॅचची चाचणी करण्यात आली, तेव्हा 48 औषधे आरोग्यास योग्य नसल्याचे आढळले. ही औषधे हेटेरो ड्रग, अल्केम लॅबोरेटरीज, हिंदुस्थान अँटीबायोटिक लिमिटेड, कर्नाटका अँटीबायोटिक अँड फार्मास्युटिकल, मेग लाइफ सायन्सेस, प्युअर अँड क्युअर हेल्थकेअर अशा काही नामांकित कंपन्यांची उत्पादने आहेत. ज्या 5 औषधांच्या संदर्भात मतभेद आहेत त्यात सन फार्मासिटिकल्स निर्मित पल्मोसिल या गोळीचा समावेश असून या गोळीची आपण निर्मिती केली नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिक्लस निर्मित टेल्मा एच ही गोळीही दर्जा सिद्ध करू शकली नसून या बॅचची निर्मिती आपण केली नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.