मुंबई – रे रोड येथील उड्डाणपुलाजवळ आज दुपारी पाणी पुरवठा कऱणारी जलवाहिनी फुटली. परिणामी उड्डाणपुलाजवळ पाणी साचले. जलवाहिनी फुटल्यामुळे शिवडी परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला.
शिवडी पूर्व परिसराला फोर्सबेरी जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. या जलाशयाला सलग्न असलेली मुख्य जलवाहिनी रे रोड पुलाजवळ सोमवारी दुपारी फुटली. यामुळे जलशयातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती झाली.पुलाच्या बाजूला पाणी साचले होते. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून वाहनांना वाट काढावी लागली. जलवाहिनी फुटल्यामुळे इंदिरा नगर, हाजी बंदर रोड, फोर्स बेरी रोड, कोळसा बंदर, रेती बंदर, जय भीम नगर, अमन शांती नगर, पारधी वाडा परिसरातील रहिवाशांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम दुपारी हाती घेतले होते.