कराड- रेशन दुकानदारांनी १ नोव्हेंबरपासून धान्यवाटप बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांशी झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर प्रलंबित मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आल्याचे दुकानदारांनी सांगितले.
अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मार्जिन मनीच्या प्रश्नावरून रेशनदुकानदारांनी संपाचा इशारा दिला होता. दुकानदारांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी दोन्ही राज्य संघटनांच्या वतीने १ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व ५६ हजार २०० रेशन दुकानदारांनी धान्य उचल बंद, धान्यवाटप बंद, दुकान बंद आंदोलन पुकारले होते. याबाबत मुंबई येथे मंत्रालयात अन्य व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी महासंघाचे राज्य अध्यक्ष डी. एन. पाटील व फेडरेशनचे राज्य अध्यक्ष गणपत डोळसे, तसेच दोन्ही संघटनांबरोबर बैठक घेतली. या वेळी दुकानदारांचे कमिशन वाढविणे व इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. नवीन येणाऱ्या मंत्रिमंडळासोबत याबाबत एकत्रित बैठक आयोजित करून हे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, असे आश्वासन देओल यांनी या वेळी दिले. त्यामुळे तूर्तास आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.