अलिबाग- रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळच्या रेवदंडा येथील आगरकोट किल्ल्याजवळील समुद्रकिनाऱ्यावर मृत व्हेल मासा वाहत आल्याची घटना रविवारी पहाटे घडली.हा
मासा किनाऱ्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.शेवटी किनाऱ्यावर खोल खड्डा खणून त्याला पुरण्यात आल्याची माहिती वनसंरक्षकांनी दिली.
रविवारी पहाटे रेवदंडा येथील स्थानिक मच्छिमारांना किनारपट्टीवर एक मोठा सागरी प्राणी वाहून आल्याचे दिसले. ही माहिती कळताच त्यानंतर खारफुटी विभागाचे वनक्षेत्रपाल अधिकारी समीर शिंदे,वनरक्षक दत्ता कोळेकर, पोलिस शिपाई गणेश चोरगे आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने पाहणी केली असता हा सागरी प्राणी म्हणजे हंपबॅक प्रजातीचा व्हेल मासा असल्याचे उघड झाले.हा सुमारे २५ फुट लांबीचा मृत मासा कुजलेला असल्याने त्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरली होती.भरतीच्या पाण्यासोबत हा व्हेल मासा किनाऱ्यावर आला होता.दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक आणि पर्यटकांची मोठी गैरसोय झाली होती. या माशाला बार्जची धडक लागून अपघात झाला असावा, अशी चर्चा नागरिक करत होते.वनक्षेत्रपालासहीत कर्मचारी आल्यानंतर या मृत माशाला जेसीबीच्या साह्याने खड्डा खणून पुरण्यात आले.