नवी दिल्ली: कडाक्याचा उन्हाळा आणि पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने सक्रिय पावले उचलली आहेत. मध्यरेल्वेच्या रेलनीर व्यतिरिक्त ९ अतिरिक्त ब्रँड पिण्याच्या पाण्याला मान्यता देण्यात आली आहे. प्रवाशांना पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आणि त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हे ब्रँड नियमितपणे तपासले जाणार असून, सक्षम प्राधिकरणाद्वारे प्रमाणितही केले जातात.
सध्या कडक उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. रेल्वेचा पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे या ९ मान्यताप्राप्त ब्रँड्सना रेल्वेने स्थानकांवर विकण्याची परवानगी दिली आहे. रेल्वेतर्फे मंजूर करण्यात आलेल्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये ऑक्सिमोर एक्वा, रोकोको, हेल्थ प्लस, गॅलन, निंबस, ऑक्सी ब्लू, सूर्य समृद्ध, एल्विश, इयोनिटा या कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अंबरनाथ (मुंबई), भुसावळ आणि इतर ठिकाणी उत्पादन आणि बाटलीबंद सुविधेसह भारतीय रेल्वेचा बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा ब्रँड असलेल्या रेल नीरव्यतिरिक्त ९ ब्रँडचे बाटलीबंद पाणी विक्रीची परवानगी मिळाली आहे. यामुळे प्रवाशांची पाण्यासाठी गैरसाेय होणार नाही.