नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’च्या शंभराव्या भागातून देशवासीयांना संबोधित केले. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे न्यू यॉर्कस्थित संयुक्त राष्ट्र मुख्यालयासह देश-विदेशात 4 लाख ठिकाणी प्रसारण झाले. भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी 100 ठिकाणी हे भाषण ऐकण्याची सोय केली होती. याशिवाय देशभरातील रेल्वे स्थानकांवर आणि राजभवनात स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक क्षणी ‘मन की बात’ हा कार्यक्रम ‘माझ्यासाठी एक अध्यात्मिक यात्रा आहे,’ अशी भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे मुंबईतही आज खास आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार, आमदार पराग अळवणी यांच्यासह हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही उपस्थित होते. विलेपार्ले परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सर्व क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. मुंबईसह उपनगरातील 36 विधानसभेतील 5 हजारांहून अधिक ठिकाणी याशिवाय भायखळा महिला कारागृह ‘मन की बात’चे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, लखनऊ येथील राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात आमिर खान, रवीना टंडन यासारखे अनेक कलाकार सहभागी झाले होते.
शंभराव्या ‘मन की बात’मध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘शंभराव्या पर्वाबाबत हजारो पत्र आणि मेसेज आले आहेत. ही पत्र वाचून माझे मन भावूक झाले. ‘मन की बात’चे शंभर भाग पूर्ण केल्याबाबत अनेकांनी माझे अभिनंदन केले, पण खरे अभिनंदनाचे पात्र ‘मन की बात’चे श्रोते आहेत. देशवासीयांच्या बलिदानाचा कळस मी दर महिन्याला पाहतो. मी तुमच्यापासून जराही दूर आहे, असे मला वाटत नाही. ‘मन की बात’ हा कार्यक्रम नसून माझ्यासाठी श्रद्धा, उपासना आणि उपवास आहे. लोक देवपूजेला जाताना प्रसादाचे ताट घेऊन येतात. भगवंताच्या रूपातील जनता जनार्दनच्या चरणी हे प्रसादाचे ताट आहे. ‘मन की बात’ कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचे प्रकटीकरण आहे. 2014 मध्ये विजयादशमीपासून ‘मन की बात’ कार्यक्रमाला सुरुवात झाली. हा कार्यक्रम देशातील चांगल्या गोष्टींचा आणि सकारात्मकतेचा अनोखा पर्व बनला आहे. हा कार्यक्रम दर महिन्याला येतो. या कार्यक्रमाची सर्वांना प्रतीक्षा असते.’
‘बेटी बचाव बेटी पढाव’ आंदोलनाबाबत बोलताना मोदींनी पुन्हा एकदा हरियाणातील सुनील यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी पंतप्रधान यांनी सुनील यांच्याकडून ‘सेल्फी विथ डॉटर’ अभियानाची माहिती घेतली आणि त्यांचे कौतुक केले. यासोबतच छत्तीसगढच्या बचत गटाच्या महिला स्वच्छता मोहीम चालवतात, तमिळनाडूच्या महिलांनी नाग नदीला पुनरुज्जीवित केले आहे. या नारीशक्तीच्या कार्याचा मोदींनी गौरव केला.
जम्मू-काश्मीरच्या मंजूर यांच्या पेन्सिल स्लेट अभियानातून 200 लोकांना रोजगार मिळत आहे. त्यांच्याशी देखील त्यांनी पुन्हा एकदा संवाद साधला. यावेळी मंजूर यांनी पंतप्रधानांना सांगितले की, ते लवकरच आणखी 200 लोकांना रोजगार देणार आहेत. तर मणिपूरच्या विजय शांती ज्या कमळाच्या धाग्यापासून कपडे बनवण्याचे स्टार्ट अप चालवतात, त्यांच्याशी मोदींनी पुन्हा एकदा संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘लोकल फॉर ग्लोबल’चा
पुनरुच्चार केला.
दरम्यान, प्रदीप सांगवान यांच्या हिलिंग हिमालयाज कॅम्पेनची एका भागात चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधला होता. आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्याशी संवाद साधला. प्रदीप सांगवान हिमालयाचे स्वच्छता अभियान चालवतात. त्यांच्या प्रयत्नाचे मोदींनी कौतुक केले.
11 परदेशी भाषांमध्येही प्रसारण
22 भारतीय भाषा आणि 29 बोलींव्यतिरिक्त 11 परदेशी भाषांमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यामध्ये फ्रेंच, चायनीज, इंडोनेशियन, तिबेटी, बर्मीज, बलुची, अरबी, पश्तू, पर्शियन, दारी आणि स्वाहिली यांचा समावेश आहे. ऑल इंडिया रेडिओच्या 500 हून अधिक प्रसारण केंद्रांद्वारे ‘मन की बात’ प्रसारित केली.
‘मन की बात’ कार्यक्रमात महिलेला प्रसूती वेदना
दिल्लीच्या विज्ञान भवनात ‘मन की बात’ कार्यक्रमाला पूनम नावाची नऊ महिन्यांची गर्भवती सहभागी झाली होती. कार्यक्रम सुरू असताना तिला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. तिने त्याबाबतची माहिती आयोजकांना देताच तिला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिने एका बाळाला जन्म दिला. ती आणि तिचे बाळ सुखरूप आहे.
रेल्वे स्टेशन ते राजभवन ‘मन की बात’चा बोलबाला
