नवी दिल्ली – अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच दिलेल्या तीन प्रशासकीय आदेशांचा प्रतिकूल परिणाम जागतिक चलन बाजारावर झाला असून आज भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८७.०७ या सार्वकालिक निचांकावर पोहोचला.ट्रम्प यांनी चीन , कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांवर भरमसाट आयातकर लावण्याची घोषणा शनिवारी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून कॅनडा आणि मेक्सिको या देशांनी अमेरिकन मालावर करवाढ करण्याचा निर्णय घेतला.परिणामी नवे व्यापारयुध्द छेडले गेले. अमेरिकेचा डॉलर अधिक मजबूत झाला. मात्र त्याचवेळी आशियाई देशांच्या चलनांवर दबाव वाढला.भारतीय रुपयामध्ये सकाळच्या सत्रात ०.५ टक्के एवढी घसरण झाली. नजिकच्या भविष्यकाळात रुपया अधिक कमकुवत होईल,अशी भीती चलन बाजारात व्यवहार करणाऱ्या व्यावसायीकांना वाटत आहे.गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडाच्या मालावर २५ टक्के, तर चीनी मालावर १० टक्के आयातकर लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
रुपयाची सार्वकालिक गटांगळी प्रति डॉलर ८७.०७ पर्यंत घसरला
