\’रिलायन्स फाऊंडेशन\” ने २० वर्षात
२ लाख गरजूंना दिली नवी \’दृष्टी \”

मुंबई – ‘रिलायन्स फाऊंडेशन दृष्टी’ या उपक्रमांतर्गत वीस हजारांहूनही जास्त निःशुल्क यशस्वी कॉर्नियल प्रत्यारोपण करण्यात आले. तर २० वर्षांच्या कारकीर्दीत आतापर्यंत पावणेदोन लाखांहूनही जास्त गरजूंना सेवा दिली आहे. तसेच नुकतेच हिंदीमागोमाग मराठी भाषेत ब्रेल वृत्तपत्र सुरू करण्यात आल्याची घोषणा रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी केली. दृष्टिहीन समुदायांना सन्मानाने आणि स्वतंत्रपणे जगता यावे यासाठी यापुढेही आम्ही कार्यरत राहू, असेही त्या म्हणाल्या.
‘रिलायन्स फाऊंडेशन दृष्टी’ हा उपक्रम सन २००३ मध्ये सुरू झाला असून त्याद्वारे देशभर नेत्रतपासणी शिबिरे आयोजित केली जातात. दृष्टिदोष असणाऱ्यांना चष्मेही दिले जातात. दृष्टी सुधारण्यासाठी मोतीबिंदू आणि कॉर्नियल प्रत्यारोपण या शस्त्रक्रियाही केल्या जातात. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, शंकरा नेत्र फाऊंडेशन आणि अरविंद आय केअर यांच्यातर्फे हे उपक्रम केले जातात. दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘रिलायन्स फाऊंडेशन दृष्टी’ तर्फे त्यांनी तयार केलेले दिवे आणि इतर भेटवस्तू यांसारखी उत्पादने खरेदी केली जातात.तसेच या संस्थेचे देशातील एकमेव पाक्षिक आंतरराष्‍ट्रीय ब्रेल वृत्तपत्र आता मराठीतही सुरू झाले आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंडच्या सहकार्याने त्याची निर्मिती होते.

Scroll to Top