नवी दिल्ली – हरियाणा राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, ऑलिम्पिकपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. या दोघांनी कालच राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सर्वत्र प्रसारित होताच आज रेल्वेने या दोघांना व्हॉट्सअॅपवर कारणे दाखवा नोटीस बजावली. यामुळे खळबळ माजली आहे. तुम्ही निवडणूक लढविणार आहात का? असा सवाल रेल्वेने केला आहे. ऐकीव बातम्यांवर अवलंबून राहून केंद्रीय रेल्वेसारख्या मोठ्या यंत्रणेने केवळ राहुल गांधींची भेट घेतली म्हणून अशी नोटीस पाठवली हे धक्कादायकच आहे.
आज विनेश फोगट आणि बजरंग पुनियाने दुपारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर ते काँग्रेसच्या मुख्यालयात पोहोचले. तिथे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रवक्ते पवन खेरा, हरयाणा प्रदेशाध्यक्ष उदय भान आणि हरयाणाचे काँग्रेस प्रभारी दीपक बाबरिया यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी उदय भान म्हणाले की, बजंरग पुनिया आणि विनेश फोगटने कुस्ती महासंघाविरुद्ध आंदोलन छेडले. त्यांच्यावर होणार्या अन्यायाविरुद्ध ते लढले. शेतकर्यांच्या आंदोलनात ते सहभागी झाले. अग्निवीर योजनेला त्यांनी विरोध केला. काही जण म्हणतात की, हे काँग्रेसचे षड्यंत्र आहे. पण अनेक ऑलिम्पिकपटू वेगवेगळ्या पक्षात आहे. मग तिथेही षड्यंत्र होते का? धक्कादायक बाब म्हणजे विनेशने आज नोकरीचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावर रेल्वेने तिला आणि बजरंग पुनियाला व्हॉट्सअॅपवरून कारणे दाखवा नोटीस पाठवली. काल हे दोघे राहुल गांधी यांना भेटले. या भेटीचे फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाले. देशाच्या विरोधी पक्षाला भेटणे हा गुन्हा आहे का? रेल्वेने म्हटले आहे की, तुम्ही निवडणूक लढवणार आहात, असे कळते. तुम्ही नोकरीत असेपर्यंत निवडणूक लढवू शकत नाही. तुम्ही नोटिशीला उत्तर द्या. म्हणजे बजरंग आणि विनेशने निवडणूक लढवणार असल्याचे कुठेही म्हटलेले नसताना रेल्वे ऐकीव बातम्या आणि चर्चांच्या आधारे अशी नोटीस कशी बजावते? आता देश या दोघांच्या पाठीशी आहे. रेल्वेला एवढेच सांगतो की, त्यांना त्रास देऊ नका. त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांना मोकळे करा.
विनेश आणि बजरंग या दोघांनीही भाजपाचे खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत आंदोलन पुकारले होते. या आंदोलनानंतर देशभरातील क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली होती. हे आंदोलन मोडून काढण्याचा सरकारने पूरेपूर प्रयत्न केला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते. तेव्हापासून सुरू असलेल्या कुस्तीपटू विरुद्ध सरकार या लढाईला आज वेगळे वळण मिळाले.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर विनेश म्हणाली की, काँग्रेसने मला त्यांच्या पक्षात प्रवेश दिला यासाठी मी त्यांची ऋणी आहे. वाईट काळात आपल्यासोबत कोण आहे हे कळते. आज मी अशा एका पक्षात प्रवेश केला आहे, जो पक्ष महिलांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यापासून ते संसदेपर्यंत लढायला तयार आहे. जेव्हा आम्हाला रस्त्यावर फरफटत आणि खेचत नेत होते तेव्हा आम्हाला भाजपा सोडून सगळ्या पक्षांनी साथ दिली. आज मी एका नव्या आयुष्याची सुरुवात करते आहे. महिलांसाठी आम्ही जो आवाज उठवला होता ती लढाई संपणार नाही ती लढाई सुरू राहणार आहे. आम्ही मागे हटणार नाही. मी आज तुम्हाला आश्वस्त करू इच्छिते की, ज्या महिला खेळाडूला वाटते आहे की, मी एकटी पडले आहे, असहाय्य झाली आहे, त्या प्रत्येक महिला खेळाडूबरोबर मी उभी आहे. मी ठरवले असते तर जंतरमंतरच्या आंदोलनावेळी कुस्तीला अलविदा केला असता. मात्र भाजपाच्या आयटी सेलने या अफवा पसरवल्या की माझे करिअर संपले आहे . त्यामुळे मी आंदोलनात उतरले. भाजपाने असा प्रचार केला की, आम्हाला राष्ट्रीय स्पर्धेत मला खेळायचे नाही. पण मी खेळले, आम्हाला ट्रायल द्यायची नाही. पण मी ट्रायल दिली. ते म्हणाले की, आम्हाला ऑलिम्पिकला जायचे नाही, पण मी ऑलिम्पिकमध्ये खेळले. मी ज्या गोष्टींचा सामना केला, तसा इतर खेळाडूंनी करावा, असे मला वाटत नाही. बजरंगवर चार वर्षांची बंदी घातली. त्याने आवाज उठवल्यामुळेच हे करण्यात आले. केवळ बोलून चालणार नाही तर मनापासून काम करू. मला माझ्या बहिणींना सांगायचे आहे की, मी तुमच्या पाठीशी उभी आहे.
बजरंग पुनिया म्हणाला की, आमचा हेतू केवळ राजकारण करणे हा होता, असे भाजपावाले म्हणत आहेत. आम्ही आंदोलन करत होतो, तेव्हा आम्ही सर्व भाजपाच्या सगळ्या खासदारांना पत्र पाठवले होते. परंतु त्यांनी आम्हाला साथ दिली नाही. काँग्रेसने आम्हाला न मागता मदत केली. आम्ही शेतकरी आंदोलन, अग्निवीर योजना, खेळाडूंसाठी आंदोलन केले. विनेश ऑलिम्पिकमधून बाहेर पडताच काही जणांनी जल्लोश केला आहे. आता आम्ही आमच्या संघर्षाची लढाई काँग्रेसकडून लढू. विनेश आणि बजरंग हे काँग्रेसकडून हरयाणाच्या विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. विनेश जुलाना मतदारसंघातून, तर बजरंगला बदली मतदारसंघातून तिकीट दिले जाईल, अशी चर्चा आहे.
विनेशला जुलानामधून उमेदवारी
काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या विनेश फोगाट हिला हरियाणातील जुलाना मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र बजरंग पुनिया निवडणूक लढविणार नाही.