नवी दिल्ली – काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज दिल्लीतील भाजीबाजारात पोहोचले. तिथे त्यांनी भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा भाव जाणून घेतला. त्यानंतर महागाईवरून केंद्राच्या धोरणांवर टीका केली. त्यांनी आपल्या भाजीबाजार भेटीचा व्हिडिओही पोस्ट केला.
यापूर्वी एक चर्मकार, मॅकेनिक आणि ट्रक ड्रायव्हरची भेट घेणारे काँग्रेस नेते राहुल गांधी आज सकाळी दिल्लीतील गिरी नगर समोरील हनुमान मंदिरच्या भाजी मंडईत गेले. सर्वसामान्यांप्रमाणे भाजी विक्रेत्याला भाजीच्या दराबाबत विचारणा केली. राहुल यांनी दुकानदाराला लसूण, टोमॅटो आणि इतर भाज्यांच्या दराची चौकशी केली. राहुल गांधी यांनी भाजी विकत घेण्यासाठी आलेल्या महिलांशी चर्चाही केली. तेव्हा महिलांनी आपल्या भावना त्यांच्याकडेे व्यक्त केल्या.
राहुल गांधी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत त्यात एक भाजीवाला त्यांना असे सांगताना दिसतो की, यंदा महागाई जास्त आहे. यापूर्वी एवढी महागाई कधीच नव्हती. तर लसणाचा 400 रुपये भाव ऐकून भाजी खरेदीसाठी आलेली महिला म्हणते की, सोने स्वस्त होईल, पण लसूण नाही. आज काय खरेदी करत आहात? असे विचारल्यावर एक महिला म्हणते की, ती थोडे टोमॅटो, थोडा कांदा विकत घेणार आहे म्हणजे काम भागेल. एक महिला भाजीवाल्याला विचारताना दिसते की, यंदा भाजी एवढी महाग का आहे? काहीच स्वस्त होताना दिसत नाही. कोणतीही भाजी 30-35 रुपयांना मिळत नाही. सर्वांचे दर 40-45 रुपयांपेक्षा जादा आहे. जी भाजी 30-40 रुपये किलो मिळायची, तिचा भाव आता 60 रुपये किलो आहे. मटर 120 रुपये किलो मिळत आहे. राहुल गांधी महिलांना विचारताना दिसत आहेत की, महागाई दरवर्षी वाढत आहे. तुमच्यावरदेखील त्याचा भार वाढला असेल ना? जीएसटीने महागाई वाढली आहे? याला महिला दुजोरा देतात. पगार वाढलेला नाही. परंतु वस्तूंचे दर वाढलेले असून, ते कमी होण्याची काही शक्यता नाही. उलट आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे, अशी तक्रार महिला करताना दिसतात.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, कधी काळी लसूण 40 रुपये किलो प्रमाणे मिळत होता, तो आता 400 रुपये किलो झाला. त्यामुळे वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या किचनचे बजेट बिघडवले आहे. तर दुसरीकडे सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपले आहे.तर व्हिडिओत ते म्हणतात की, लोक काय खातील आणि काय वाचवतील हा विचार करण्यासारखा विषय आहे. बचत कठीण झाली आहे. काहींना रिक्षाचे भाडे आणि जेवणाचा खर्च भागवणेही अवघड बनलेले आहे.