राहुल गांधींवरील कारवाईविरोधात काँग्रेसचे जय भारत सत्याग्रह आंदोलन

मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधींवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज घाटकोपरच्या माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जय भारत सत्याग्रहच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस नेते भाई जगताप, चरणसिंह सप्रा यांच्यासह अन्य काँग्रेस नेतेही सहभागी झाले होते. याशिवाय आज महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्यांक विभागाने धरणे आंदोलन केले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की, “मोदी-अदानीचा संबंध काय? अदानीच्या कंपनीत शेल कंपन्यांचे 20 हजार कोटी रुपये कुठून आले? फक्त अदानीलाच देशातील व परदेशातील कंत्राटे देण्याचे कारण काय? हे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले म्हणून राजकीय सुडबुद्धीने भाजपा सरकारने राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली.”

जय भारत सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातून नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना सांगितले की, मोदी-अदानीच्या भ्रष्ट युतीचा भांडाफोड करा, सर्वसामान्य जनतेचे पैसे कसे लुटले, राहुल गांधी जनतेचे प्रश्न मांडत असताना त्यांच्यावर भाजपा सरकारने राजकीय आकसातून कारवाई केली, हे जनतेपर्यंत जाऊन सांगा. काँग्रेस पक्षात विविध प्रकारचे 39 सेल आहेत, या सेलच्या माध्यमातून प्रत्येक समाज घटकाला काँग्रेस विचारधारेशी जोडून हुकुमशाही आणि गरीब, दलित आदिवासी व अल्पसंख्यांकविरोधी विरोधी भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कामाला लागा असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Scroll to Top