लखनौ
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज उत्तर प्रदेशमधील अलीगढचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पिलखाना गावात जाऊन हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राहुल यांनी आधी मंजू देवी यांचे पती आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत अपघाताची माहिती घेतली. हाथरस अपघातात मंजू देवी आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचे राहुल गांधी यांनी आश्वासन दिले.
आज पहाटे ५.४० वाजता राहुल गांधी दिल्लीहून अलीगढसाठी निघाले. विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाल्यानंतर राहुल यांचा हा पहिलाच दौरा आहे. यापूर्वी ते निवडणूक जिंकून रायबरेलीला गेले होते. राहुल यांनी मंजू देवी यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. “वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या. आम्हाला ज्या प्रकारे मदत व्हायला हवी होती तशी मदत झाली नाही,” असा आरोप मंजू देवी यांच्या मुलीने केला. यानंतर “काँग्रेसचे लोक तुम्हाला मदत करतील. अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत. आता तुम्ही आमच्या कुटुंबातील सदस्य आहात,” असा विश्वास राहुल यांनी दिला.